मुंबई - राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा बहुचर्चित ‘झुंड’ आज प्रदर्शित झालाय आणि सध्या सर्वत्र या आणि याच चित्रपटाची चर्चा आहे. अगदी बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान पासून साऊथचा सुपरस्टार धनुषपर्यंत सगळ्यांनी ‘झुंड’ (Jhund) बनवणाऱ्या नागराज यांची पाठ थोपटली आहे. फॅन्ड्री, सैराटनंतर नागराजचा झुंड सिनेमा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडियातून या सिनेमाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
कोरोनामुळे तब्बल 2 वर्षांनी चित्रपटगृहे 100 टक्क्यांनी खुली झाली असून पहिलाच सिनेमा म्हणून झुंडकडे पाहिलं जात आहे. झुंड सिनेमात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. त्यामुळे, मंजुळे आणि अमिताभ हे कॉम्बिनेशन लोकांना चांगलंच आवडलंय. तर, आता नागराजच्या पुढील चित्रपटांत कोण बडा स्टार असणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मात्र, स्वत: नागराजनेच याबद्दल माहिती दिली.
मी माझ्या फॅँन्ड्री या चित्रपटापासून आमीर खान यांना चित्रपट दाखवत आलोय. त्यामुळे, माझ्या कलाकृतीसंदर्भात मी नेहमीच त्यांच्याशी चर्चा करतो. मला भविष्यात आमीर खानला घेऊन चित्रपट बनवायचा आहे, त्याबाबत डोक्यात कल्पनाही आहेत, असे नागराजने एका हिंदी चॅनेल्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. यापूर्वी फॅन्ड्री, सैराट चित्रपटांचेही त्यांनी कौतूक केले होते. तर, झुंडबद्दलही ते भरभरुन बोलले आहेत, असेही नागराजने म्हटले. त्यामुळे, नागराजच्या आगामी सिनेमातील बडा स्टार म्हणजे आमीर... असंच म्हणावं लागेल.
झुंडबद्दल काय म्हणाला होता आमीर मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) याने 'झुंड' सिनेमा पाहिला आणि त्याची प्रतिक्रिया मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून यावा अशीच आहे. होय, ‘झुंड’ पाहून आमिर खानला त्याचे अश्रू रोखता आले नाहीत. हा मी पाहिलेल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे, अशी प्रतिक्रिया त्याने दिलीये. आमिर खानसाठी ‘झुंड’चं स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. या स्क्रिनिंगला नागराज मंजुळे, टी सीरिजचे भूषण कुमार आणि चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. चित्रपट संपला आणि स्क्रिनिंगला उपस्थित सगळ्यांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला. आमिरला तर चित्रपटाचं कौतुक करायला शब्द मिळेनात. चित्रपट पाहताना त्याचे अक्षरश: डोळे पाणावले. या स्पेशल स्क्रिनिंगचा व्हिडीओ नागराज यांनी शेअर केला आहे. यात आमिर ‘झुंड’बद्दल भरभरून बोलतोय.