Join us

नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ अडचणीत!  प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 3:38 PM

होय, चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी करणारी याचिका तेलंगणाच्या रंगा रेड्डी जिल्ह्यातील मियापूर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे नंदी कुमार यांच्या दाव्यानुसार, अखिलेश पॉल यांच्याशिवाय विजय बारसे यांचे बायोपिक पूर्णच होऊ शकत नाही. 

सैराट, फँड्रीसारखे तगडे सिनेमे दिल्यानंतर नागराज मंजुळेने हिंदीत उडी ठोकली आणि ‘झुंड’ या हिंदी सिनेमाची घोषणा झाली. चित्रपटात अमिताभ बच्चन सारख्या महानायकाची वर्णी लागली. चित्रपट बनून तयार झाला. पण लॉकडाऊनमुळे अडकला. अशात ‘झुंड’ ओटीटीवर रिलीज होणार असल्याचीही चर्चा रंगली. पण आता ‘झुंड’चे प्रदर्शन लांबण्याची चिन्हे आहे. होय, चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी करणारी याचिका तेलंगणाच्या रंगा रेड्डी जिल्ह्यातील मियापूर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणावर येत्या 28 तारखेला सुनावणी होणार आहे.हैदराबादचे चित्रपट निर्माते नंदी चिन्नी कुमार यांनी ही याचिका दाखल केली आहे. ‘झुंड’ चित्रपट  कॉपीराइटचे उल्लंघन असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

‘झुंड’ हा अमिताभ व नागराज यांचा सिनेमा विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे. विजय बारसे यांनी  गरिब वस्तीत राहणा-या मुलांची फुटबॉल टीम बनवली होती. याचीच ही कथा. पण आता ही कथा अखिलेश पॉल या नावामुळे वादात सापडली आहे. अखिलेश पॉल हा नागपूरच्या झोपडपट्टी भागात राहणारा व्यसनी मुलगा. त्याला फुटबॉलची आवड असते. फुटबॉलची हीच आवड त्याचे संपूर्ण आयुष्य बदलते. विजय बारसे यांनी त्याला तयार केले. आज अखिलेश स्लम फुटबॉल खेळतो.

काय आहे प्रकरण

 नंदी कुमार यांच्या दाव्यानुसार, अखिलेश पॉल यांच्याशिवाय विजय बारसे यांचे बायोपिक पूर्णच होऊ शकत नाही.  2017 मध्ये नंदी कुमार यांनी ‘स्लम सॉकर’ फुटबॉलपटू अखिलेश पॉलच्या जीवनावर आधारित चित्रपट काढण्यासाठी हक्क विकत घेतले. त्यानंतर नंदी कुमार यांनी त्याच्या आयुष्यावरच्या चित्रपटाची योजना आखली. 11 जून 2018 रोजी नंदी चिन्नी कुमार यांनी तेलंगणा सिनेमा रायटर असोसिएशनकडे या चित्रपटाच्या कथेची अधिकृतरित्या नोंदही केली. परंतु, याचदरम्यान दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी अखिलेश पॉल यांना प्रशिक्षण देणारे विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे हक्क विकत घेतले. या चित्रपटात विजय बारसेसह अखिलेश पॉलचा जीवन प्रवास दाखवण्यात येणार आहे. म्हणून कुमार यांनी नागराज मंजुळे आणि चित्रटातील काही व्यक्तींवर कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली. ‘झुंड’चे चित्रपटगृहातील व ओटीटीवरचे प्रदर्शन थांबवावे, अशी मागणी नंदी कुमार यांनी केली आहे. 

टॅग्स :नागराज मंजुळेअमिताभ बच्चन