दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या बहुप्रतिक्षित ‘झुंड’ ( Jhund) या हिंदी सिनेमाचा (Jhund Teaser) टीझर रिलीज झाला आहे आणि तो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. येत्या 4 मार्चला हा सिनेमा चित्रपटगृहांत प्रदर्शित होतोय आणि त्याआधी या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.
टीझर भन्नाट आहे. गल्लीतली पोरांचा जबरदस्त बँड धम्माल करतोय. अशात अमिताभ यांची एन्ट्री होते. सुरूवातीला त्यांची पाठमोरी आकृती दिसते आणि टीझरच्या शेवटी त्यांची जबरदस्त एन्ट्री होते. त्यांना पाहताच मुलं त्यांच्यामागे धावत सुटतात. ‘बडी फिल्म बडे परदे पर,’असं कॅप्शन देत नागराज यांनी चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.
फँड्री,सैराट सारखे तगडे मराठी सिनेमे दिल्यानंतर मराळमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी हिंदीत उडी घेतली आणि ‘झुंड’या हिंदी सिनेमाची घोषणा झाली. अमिताभ बच्चन सारख्या महानायकाची या चित्रपटात वर्णी लागली. चित्रपट बनून तयार झाला. पण लॉकडाऊनमुळे अडकला. लॉकडाऊन उठला, पण यादरम्यान ‘झुंड’ कायद्याच्या कचाट्यात अडकला. अर्थात इतके सगळे अडथळे पार केल्यानंतर अखेर‘झुंड’ची रिलीज डेट कन्फर्म झाली आहे. झुंड नही टीम कहिये, अशी टॅगलाइन असलेला या सिनेमाच्या प्रदर्शनासाठी 4 मार्चचा मुहूर्त ठरला आहे. चित्रपटगृहांत हा सिनेमा रिलीज होणार आहे.
नागराज यांचा हा सिनेमा विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे. विजय बारसे यांनी गरिब वस्तीत राहणा-या मुलांची फुटबॉल टीम बनवली होती. याचीच ही कथा. हा एक स्पोर्ट ड्रामा आहे.