Nana Patekar News मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या आणि वर्षानुवर्षे अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे नाना पाटकेर. 'तिरंगा', 'क्रांतीवीर', 'अग्नीशक्ती', 'परिंदा', 'शक्ती', 'अंगार' अशा सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. एकीकडे प्रसिद्धी आणि करिअरची उंची गाठणारे नाना दुसरीकडे मात्र नशेच्या आहारी गेले होते. त्यांना धुम्रपानाचं व्यसन लागलं होतं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नानांनी याबाबत पहिल्यांदाच भाष्य करत मोठा खुलासा केला आहे.
नाना पाटेकरांनी नुकतीच 'द लल्लनटॉप' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अभिनयातील करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही भाष्य केलं. यावेळी नानांनी दिवसाला ६० सिगारेट पित असल्याचा धक्कादायक खुलासा केला. पण, नंतर मात्र एका व्यक्तीमुळे त्यांचं जीवनच बदललं. याबद्दल सांगताना नाना म्हणाले, "मी तेव्हा दिवसाला ६० सिगारेट प्यायचो. दिवसाला मी सिगारेटचे तीन पॅकेट संपवायचो. अंघोळ करतानाही मी सिगारेट ओढायचो. माझ्या कारमध्येही कोणी बसायचं नाही. कारण, सिगारेटचा वास यायचा. मी कधीच दारू एवढी प्यायलो नाही. पण, सिगारेटचं मला व्यसन लागलं होतं. माझ्या बहिणीच्या एकुलत्या एक मुलाचं निधन झालं होतं. मी सिगारेट पीत होतो आणि मला खोकला लागला होता. आठ दिवसांपूर्वीच तिने तिच्या मुलाला गमावलं होतं. मला खोकताना पाहून ती म्हणाली की अजून मला काय काय पाहावं लागणार आहे...तेव्हा मला खूप वाईट वाटलं".
"मी त्यादिवशी सिगारेट प्यायलो नाही. दुसऱ्या दिवशी पण नाही. आणि तिसऱ्या दिवशीही मी सिगारेटला हात लावला नाही. त्यानंतर मग मी मुंबईला आलो. पाच दिवसांनंतर मी बहिणीला फोन केला. तिची विचारपूस केली आणि तिला सांगितलं की पाच दिवसांपासून मी सिगारेट ओढलेली नाही. ती म्हणाली की तू सिगारेट ओढणं कमी कर. तुला त्रास होतो. तेव्हा मी रोज म्हणायचो की आज सिगारेट ओढणार नाही. आता २० वर्ष झाली असतील. आतादेखील मी रोज हेच म्हणतो. तेव्हाच सिगारेट सोडली", असंही पुढे नाना म्हणाले.