तेलुगू सिनेइंडस्ट्रीमध्ये अभिनेता नंदमुरी बालकृष्ण (Nandamuri Balakrishna) यांचा चांगलाच दबदबा आहे. उत्तम अभिनय कौशल्यामुळे कायमच चाहत्यांच्या चर्चेत असतात. परंतु, त्यांच्या एका चुकीच्या वर्तनामुळे सध्या ते सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. अनेकांनी त्यांना महिलांचा आदर करा असा सल्ला देत ट्रोल केलं आहे. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यानंतर त्यांच्या ट्रोलिंगला सुरुवात झाली आहे.
सोशल मीडियावर सध्या नंदमुरी बालकृष्ण यांचा एका इव्हेंटमधील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात त्यांनी स्टेजवर उभ्या असलेल्या एका अभिनेत्रीला चक्क धक्का मारला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे संबंधित अभिनेत्रीदेखील गोंधळून गेली. ज्यामुळे आता नंदमुरी ट्रोल होत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नंदमुरी आणि अन्य काही कलाकार मंडळी एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी स्टेजवर नंदमुरी, अभिनेत्री अंजली आणि नेहा शेट्टीदेखील होत्या. यावेळी स्वत:ला स्टेजवर नीट उभं राहता यावं यासाठी त्यांनी अभिनेत्रींना बाजूला सरकण्यास सांगितलं. मात्र, अंजलीने साडी नेसल्यामुळे तिला पटकन मागे होता आलं नाही. ज्यामुळे नंदमुरी यांनी कसलाही विचार न करता तिला जोरात धक्का मारला. अचानक मारलेल्या या धक्क्यामुळे अंजली मागे ढकलली गेली.
अंजलीला नंदमुरी यांनी धक्का मारल्यानंतर नेहा शेट्टीने तिचा तोल सावरला आणि तिला आधार दिला. मात्र, अंजलीला धक्का मारल्यानंतरही नंदमुरी दोघींकडे पाहून काही तरी पुटपुटत होते. ज्यामुळे नंदमुरी आता ट्रोल होऊ लागले आहेत.
दरम्यान, व्हायरल होत असलेला व्हिडीओ गँग्स ऑफ गोदावरी या सिनेमाच्या एका प्रमोशनदरम्यानचा आहे. या सिनेमात अंजली, नेहा आणि विश्वाक मुख्य भूमिकेत झळकले आहेत. अंजली तेलुगू सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत Angaadi Theru, Engaeyum Eppothum, Seethamma Vakitlo Sirimalle Chettu आणि गीतांजली यांसारख्या तेलुगू, तामिळ सिनेमात काम केलं आहे.