Join us

Manto Movie:‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द! नंदिता दासने असा व्यक्त केला संताप!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 6:48 PM

Manto Movie: ‘मंटो’ या चित्रपटावर नंदिता दास अनेक वर्षांपासून काम करत होती. त्यामुळे शुक्रवारी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाचा मॉर्निंग शो रद्द करण्यात आल्याने नंदिता दुखावली गेली. तिने ट्विटरवर आपला संताप बोलून दाखवला.

नंदिता दास आणि प्रसिद्ध लेखक सआदत हसन मंटो यांच्या दोन्ही दिग्गजांच्या चाहत्यांची प्रतीक्षा आज शुक्रवारी संपली. मंटो यांच्या आयुष्यावर बेतलेला नंदिता दास दिग्दर्शित ‘मंटो’ प्रदर्शित झाला. या चित्रपटावर नंदिता दास अनेक वर्षांपासून काम करत होती. त्यामुळे शुक्रवारी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाचा मॉर्निंग शो रद्द करण्यात आल्याने नंदिता दुखावली गेली. तिने ट्विटरवर आपला संताप बोलून दाखवला.

पीव्हीआरला शुक्रवारी कथितरित्या काही तांत्रिक अडचणींमुळे ‘मंटो’चा मॉर्निंग शो रद्द करावा लागला. नंदिताला हे खटकले. तिने ट्विटरवर याबद्दलची आपली नाराजी बोलून दाखवली. ‘प्रचंड निराशा झाली. सहा वर्षांचे अथक प्रयत्न,अनेक लोकांची मेहनत पाण्यात गेली, असे वाटले. ‘मंटो’ दुपारच्या शोमध्ये दाखवला जाईल, असे मला वायकॉम 18 मुव्हीजकडून सांगण्यात आले आहे. पण हे शक्य नसेल तर कृपया आम्हाला कळवा. ‘मंटोइयत’चा प्रचार थांबणारा नाही...,’ असे ट्विट नंदिताने केले. अर्थात पीव्हीआरने प्रेक्षक आणि नंदिताला दिलासा देत, तांत्रिक अडचण सोडवली जात असल्याचे म्हटले आहे.

सआदत हसन मंटो हे एक उर्दू साहित्यिक व लघुकथाकार होते. त्यांची कथा भारताची फाळणी, समाजातील दारिर्द्य, वेश्यावृत्ती, इत्यादी विषयांच्या आसपास फिरते. लिखाणातील अश्लीलतेच्या आरोपावरून त्यांना हिंदुस्थानच्या फाळणीपूर्वी व फाळणीनंतर असे एकूण सहा वेळा तुरुंगातही जावे लागले, परंतु त्यांच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. आपल्या ४२ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी एकूण २२ कथासंग्रह, एक कादंबरी, व इतरही साहित्य लिहिले.

टॅग्स :मंटोनंदिता दास