Join us

अतुल परचुरेंच्या निधनानंतर नरेंद्र मोदींचं सोनिया परचुरेंना भावनिक पत्र, म्हणाले- " या कठीण काळात..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 2:05 PM

अतुल परचुरेंच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदींनी अतुल परचुरे यांच्या पत्नी सोनिया परचुरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी परचुरे कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे. 

मराठीतील ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं यांचं सोमवारी(१४ ऑक्टोबर) निधन झालं. ५७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही वर्षांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. यातून ते पूर्णपणे बरेदेखील झाले होते. परंतु, काही दिवसांपूर्वी तब्येत बरी नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर त्यांची कॅन्सरशी झुंज संपली. अतुल परचुरे यांच्या निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी(१६ ऑक्टोबर) अंत्यसंस्कार करण्यात आले. अतुल परचुरेंच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. 

नरेंद्र मोदींनी अतुल परचुरे यांच्या पत्नी सोनिया परचुरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी परचुरे कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे. 

नरेंद्र मोदींचं सोनिया परचुरेंना पत्र 

अतुल परचुरे यांच्या निधनाची बातमी मिळाल्यानंतर प्रचंड दुःख झालं. ही पोकळी कधीही भरुन न निघणारी आहे. 

 

ते सिनेइंडस्ट्रीतील अष्टपैलू अभिनेते होते. शिवाय मराठी आणि हिंदी सिनेविश्वातील त्यांच्या अमुल्य योगदानाला कधीही विसरता येणार नाही. त्यांचं विनोदाचं टायमिंगही कमाल होतं. त्यांच्या कामामुळे ते कायमच आपल्या स्मरणात राहतील. 

अतुल परचुरे यांचं कार्य आणि विचार कायम कुटुंबाला प्रेरणा देत राहील. या कठीण प्रसंगी कायम त्यांच्यासोबत घालवलेला वेळ आणि आठवणी हा कुटुंबासाठी आधार आहे. 

त्यांनादेखील कुटुंबाची, मित्रांची आणि चाहत्यांची आठवण येत असेल… पण ते कायम आपल्या हृदयात असतील.  शिवाय या कठीण काळात देव त्यांच्या कुटुंबियांनी शक्ती देवो… असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतुल परचुरे यांना श्रद्धांजली वाहिली.

अतुल परचुरे रंगभूमीवर रमणारे अभिनेते होते. 'तरुण तुर्क म्हातारे अर्क', 'प्रियतमा', 'वासूची सासू', 'आम्ही आणि आमचे बाप' या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारली. शिवाय 'आर के लक्ष्मण की दुनिया', 'जागो मोहन प्यारे' सारख्या हलक्याफुलक्या मालिकेत काम केलं.  त्यांनी पु. ल. देशपांडे यांच्या समोर त्यांचीच व्यक्तिरेखा  'व्यक्ती आणि वल्ली' या नाटकात अत्यंत उत्तम पद्धतीने साकारली. कपिल शर्मा शोमध्येही त्यांनी सर्वांना खळखळून हसवलं. आता ते पुन्हा 'सूर्याची पिल्ले' या नाटकातून दमदार कमबॅक करणार होते. मात्र त्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे.

टॅग्स :अतुल परचुरेनरेंद्र मोदीमराठी अभिनेता