भारतीय सिनेमाच्या पहिल्या फिमेल सुपरस्टार म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, त्या नसीम बानो यांचा आज (4 जुलै) वाढदिवस. नसीम बानो यांची दुसरी एक ओळख द्यायची झाल्यास, त्या अभिनेत्री सायरा बानो यांच्या आई आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री दिलीप कुमार यांच्या सासूबाई. 4 जुलै 1916 रोजी नसीम बानो यांचा जन्म झाला.
नसीम बानो अगदी शाही थाटात लहानाच्या मोठ्या झाल्यात. त्यांचा थाट असा होता की, शाळेत त्या पालखीने जात. नसीम इतक्या सुंदर होत्या की, त्यांना कायम पडद्यात ठेवले जाई. एकदा नसीम आईसोबत ‘सिल्वर किंंग’ या चित्रपटाचे शूटींग पाहायला गेल्या आणि हे शूटींग पाहतानाच मी अभिनेत्री होणार हे नसीम यांनी ठरवून टाकले. त्याचक्षणी नसीम यांचे सौंदर्य पाहून त्यांना चित्रपटाची आॅफरही मिळाली. पण नसीम यांच्या आईने ती लहान आहे, तिला कळत नाही, असे म्हणून ही ऑफर मनावर घेतली नाही.
याचदरम्यान निर्माते सोहराब मोदी यांनी नसीम यांना आपल्या ‘खून का खून’ या चित्रपटाची ऑफर दिली. नसीम यांच्या आईने ही ऑफरही नाकारली. पण नसीम मानेनात. त्या जिद्दीस पेटल्या. केवळ इतकेच नाही तर मला चित्रपटात काम करू दिले नाही तर मी उपोषणावर बसेल, असेही त्यांनी जाहिर केले. त्यानुसार त्यांनी अन्नपाणी सोडले. त्यांच्या या हट्टापुढे अखेर सगळ्यांनीच हार मानली.नसीम बानो यांनी सोहराब मोदी यांच्यासोबत अनेक चित्रपट केलेत. तलाक, मीठा जहर, बसंती असे अनेक़ पण ‘पुकार’ या चित्रपटात नूरजहांची भूमिका साकारून नसीम बानो कमालीच्या लोकप्रिय झाल्या.
नसीम बानो यांनी मियां अहसान उल हकसोबत लग्न केले. त्यांनी ताजमहल पिक्चर्स नावाचे बॅनरही सुरु केले. या बॅनरखाली त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली. फाळणीच्या काळात नसीम पतीसोबत पाकिस्तानात गेल्या. काही वर्षांनंतर नसीम आपल्या दोन मुलांना घेऊन पुन्हा भारतात परतल्या. सायरा बानो आणि दिलीप कुमार यांच्या लग्नात नसीम यांनी मोठी भूमिका बजावली. 18 जून 2002 रोजी वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.