बॉलिवूडचे वरिष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांचे अनेक विधानं चर्चेत असतात. त्यांच्या अभिनयाला तर तोडच नाही. मात्र त्यांचे विचार अनेकदा लोकांना खटकतात. अनेक सामाजिक आणि राजकीय विषयांवर ते वक्तव्य करतात. नुकतंच त्यांनी 'काश्मीर फाईल्स' आणि 'गदर 2' सारखे चित्रपट कसे काय चालू शकतात असा थेट प्रश्न विचारलाय. त्यांच्या या वक्तव्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
नसीरुद्दीन शाह यांनी तब्बल १७ वर्षांनी दिग्दर्शनात कमबॅक केलंय. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'मॅन वुमन मॅन वुमन' सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी आजकालच्या हिट सिनेमांवर भाष्य केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना बॉलिवूडमध्ये आता फिल्ममेकिंगचा उद्देश बदलला आहे असं वाटतं का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, 'होय, तुम्ही जितके जास्त अंधराष्ट्र्वादी व्हाल तितके तुम्ही प्रसिद्ध व्हाल. कारण हेच लोक देश चालवत आहेत. आपल्या देशावर प्रेम करणं आता पुरेसं राहिलं नाही. तुम्हाला ओरडून ओरडून सांगावं लागेल आणि काल्पनिक वैरही घ्यावं लागेल. या लोकांना कळत नाही की हे किती धोकादायक आहे.'
ते पुढे म्हणाले, 'गदर 2 आणि द केरळ स्टोरी सारखे चित्रपट जे मी अजून पाहिले नाहीत पण मला माहित आहे की ते कशाबद्दल आहेत. मला आश्चर्य वाटतं की काश्मीर फाईल्स सारखे सिनेमे हिट होतात पण सुधीर मिश्रा, अनुभव सिन्हा, हंसल मेहता यांनी बनवलेले सिनेमे जे सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतात त्याकडे कोणीच बघत नाही. असे फिल्ममेकर निराश होत नाहीत आणि सत्य गोष्टी दाखवत राहतात.' '
१०० वर्षांनंतर लोक 'भीड' आणि 'गदर 2' बघतील तेव्हा त्यांना समजेल की कोणता चित्रपट सत्य दाखवत होता. कारण चित्रपट हे सत्य दाखवण्याचं सक्षम माध्यम आहे.' 'मॅन वुमन मॅन वुमन' हा नसीरुद्दीन शाह यांनी दिग्दर्शित केलेला दुसरा सिनेमा आहे. याआधी त्यांनी इरफान खान स्टारर 'यू होता तो क्या होता' सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. १७ वर्षांनंतर त्यांनी दिग्दर्शनात कमबॅक केलं आहे.