Naseeruddin Shah : ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह आगामी 'ताज-डिव्हायडेड बाय ब्लड' या आगामी वेबसिरीजमुळे चर्चेत आहेत. त्यांचीही अनेक विधानं नेहमीच वादग्रस्त किंवा लक्ष वेधून घेणारी असतात. नुकत्याच त्यांच्या एका वक्तव्याने चर्चेला उधाण आले होते. मुघलांनी देशाचे नुकसान केले असे वाटत असेल तर ताज महाल, लाल किल्ला, कुतूबमिनार पाडून टाका असं ते म्हणाले होते.
आगामी वेबसिरीजच्या प्रमोशनदरम्यान नसीरुद्दीन शाह यांची एक जुनी मुलाखत पुन्हा व्हायरल होत आहे. ते म्हणतात, 'मला सांगा, हिंदी फिल्म इंडस्ट्रीनं तरी कोणत्या समाजाला सोडलं आहे. स्टिरियोटाइपींगचे तर ते मास्टर आहेत. शीख समुदाय असो, पारसी समुदाय असो प्रत्येकाचीच खिल्ली उडवली गेली. मुसलमान असा मित्र दाखवला जातो जो हिरोचे प्राण वाचवतो आणि शेवटी मरतो. म्हणजेच काय तर त्याचं मरणं निश्चितच आहे.'
या मुलाखतीत त्यांच्या पत्नी रत्ना पाठक शाह देखील होत्या. त्या म्हणाल्या,' बॉलिवूडनं असाच विनोद म्हणून जाड बाई आणि सडपातळ नवरा असंच दाखवलंय, दुसरं काय केलंय? हेच पर्याय होते नेहमी. '
Naseeruddin Shah: "असे असेल तर ताज महाल, लाल किल्ला, कुतूबमिनार पाडून टाका"; नसीरूद्दीन शाह भडकले
आपण नेहमीच दुसऱ्यांच्या संकटांवर हसत आलोय. आपल्याला स्वत:वर हसायला जमतच नाही. कोणी आपली खिल्ली उडवली तर आपल्याला वाईट वाटते हेच दुसऱ्यांची खिल्ली उडवताना आपण काहीच विचार करत नाही. आपल्या चित्रपटांनी नेहमीच अशा गोष्टींना प्रोत्साहन दिलं आहे. जाणुनबूजून केले आहे. १०० वर्षांपासून हे सुरु आहे.'
नसीरुद्दीन शाह यांची 'ताज-डिव्हायडेड बाय ब्लड' ही वेबसिरीज ३ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. मुघल शासन काळावर सिरीज बेतलेली आहे, तर शाह यांनी अकबरची भुमिका साकारली आहे.