मोठी स्टारकास्ट असलेला एखादा चित्रपट प्रदर्शित होणार असला की, त्या काळात प्रदर्शित होणारे इतर चित्रपट आपल्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे-मागे करतात. हा ट्रेंड हिंदीप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीतही दिसून येतो, पण 'मोहर' हा चित्रपट मात्र याला अपवाद ठरला आहे. नवीन वर्षाची सुरुवात अभिनेता नाना पाटेकर यांच्या 'नटसम्राट' या चित्रपटाने होत असतानाच, त्याचदिवशी म्हणजे, १ जानेवारी रोजी दिग्दर्शक विजय पाटकर यांचा 'मोहर' हा चित्रपट आता या 'नटसम्राट'च्या समोर उभा ठाकला आहे.वि. वा. शिरवाडकर यांच्या 'नटसम्राट' या नाटकावर आधारित त्याच शीर्षकाचा चित्रपट घेऊन, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नववर्षाची सुरुवात करण्याचे पक्के केले आणि चतुरस्र अभिनेता नाना पाटेकर यांना या शीर्षक भूमिकेत आणून त्यांनी या नटसम्राटाची बाजू आधीच भक्कम करून ठेवली आहे. १ जानेवारीच्या शुक्रवारी 'नटसम्राट' प्रदर्शित होणार म्हणून, इतर कुणीही या तारखेला चित्रपट प्रदर्शित धजत नव्हते. मात्र, आता 'मोहर' या चित्रपटाने त्यात थेट उडी घेतली आहे.वास्तविक, 'मोहर' हा चित्रपट डिसेंबरमध्येच प्रदर्शित होणार होता आणि त्याच्या तारखाही जाहीर झाल्या होत्या, पण चित्रपट प्रदर्शनात आलेल्या काही अडचणींमुळे हा चित्रपट पुढे गेला आणि आता हा मोहर १ जानेवारीला फुलणार आहे. याबाबत बोलताना विजय पाटकर म्हणतात, ‘काही कारणांमुळे आमचा चित्रपट पुढे गेला आहे हे खरे आहे. मुळात या चित्रपटाचे दिग्दर्शन माझा अगदी जवळचा मित्र संजीव नाईक करणार होता, परंतु अचानक त्याला झालेल्या अपघातामुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे या सिनेमाच्या दिग्दर्शनासाठी त्याने निर्मात्यांना माझे नाव सुचवले आणि हा चित्रपट माझ्याकडे आला.’विशेष म्हणजे, विजय पाटकर यांनी दिग्दर्शित केलेला 'कॅरी आॅन देशपांडे' हा चित्रपट ११ डिसेंबर रोजी पडद्यावर आला होता आणि त्यानंतर त्यांचा दिग्दर्शक म्हणून 'मोहर' हा लागोपाठ येणारा चित्रपट ठरला आहे. 'मोहर' या चित्रपटात सयाजी शिंदे, प्रसाद ओक व अदिती सारंगधर यांच्या प्रमुख भूमिका असून, बालकलाकार प्राजक्ता जगताप व चैतन्य घाडगे हे दोघे 'मोहर'मधून मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत.
- raj.chinchankar@lokmat.com