अमेरिकेतील न्यू यॉर्क येथे रंगणाऱ्या मानाच्या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये, राष्ट्रीय पुरस्कार विजेता निशांत रॉय बोम्बार्डे लिखित आणि दिग्दर्शित 'गैर' या शॉर्ट फिल्मची ‘शॉर्टस्’ या विभागांतर्गत निवड करण्यात आली आहे. ह्या फेस्टिवलमधे फिल्मचा वर्ल्ड प्रिमियर होणार आहे.
'ग़ैर' ही गोष्ट आहे दिल्लीत राहणाऱ्या पंकज आणि राहुलची, राहुल त्याच्या आई-वडिलांसोबत दिल्लीत सुखवस्तू घरात राहणारा मुलगा. त्यांच्या घरातला भाडेकरू, पंकज नुकताच दिल्लीत आलेला.. हे नवं शहर, तिथली माणसं समजून घेण्याचा प्रयत्न करणारा पंकज मितभाषी, स्वाभाविक शांत तर कॉलेजला जाणारा राहुल चंचल पण साधा..
ह्या फिल्म मध्ये निशांतने, पंकज आणि राहुलचं भावविश्व अत्यंत हळुवारपणे, संवेदनशीलतेनं उलगडून ठेवलं आहे. ह्या प्रसंगी निशांत रॉय बोम्बार्डे म्हणाले,"दारवठा बनवत असतानाच 'ग़ैर'ची गोष्ट गवसली. दारवठामधला लहानगा पंकज स्वतःचं 'वेगळे'पण चाचपडत होता आणि हाच पंकज आता मोठा झालाय असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
चित्रपटात पंकजच्या भूमिकेत तन्मय धनानीया असून तब्बर फेम साहिल मेहता राहुलच्या भूमिकेत आहे. या आधी तन्मयने ब्रह्मन नमन, द रेपिस्ट आणि निषिद्धो ह्या चित्रपटात महत्चाच्या भूमिका बजावल्या आहेत. निशांत रॉय बोम्बार्डे ह्याने याआधी फँड्री, एलिझाबेथ एकादशी, किल्ला आणि सैराट ह्या चित्रपटांमध्ये कार्यकारी निर्मात्याची भूमिका बजावली आहे. २०१६ मध्ये 'दारवठा' ह्या मराठी शॉर्ट फिल्म साठी 'पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' चा राष्ट्रीय पुरस्कार त्याला मिळाला होता.७ ते १३ मे २०२२ दरम्यान हा फेस्टिवल न्यू यॉर्क येथे आयोजित करण्यात येणार आहे.