राष्ट्रीय पुरस्कार विजेते फिल्म एडिटर वामन भोसले यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. आज सकाळ त्यांची प्राणज्योत मालवली. ते 87 वर्षांचे होते.
वामन भोसले यांचे पुतणे दिनेश भोसले यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, वामन भोसले यांचे गोरेगाव येथील त्यांच्या निवास्थानी सकाळी निधन झाले. गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या प्रार्दभावामुळे त्यांना घरातून जास्त बाहेर पडता येत नव्हते. त्यांच्या दिनचर्येवर याचा परिणाम झाला होता.
गोवा येथील पोमबुर या गावात जन्मलेले वामन भोसले कामानिमित्त 1952 मध्ये मुंबईत आले. त्यांनी मुंबईत आल्यावर पाकिजा चित्रपटाचे एडिटर डि.एन.पै यांच्याकडे बॉम्बे टॉकिजमध्ये चित्रपटाविषयी धडे घेतले.
वामन भोसले यांनी ‘मेरा गांव मेरा देश’, ‘दो रास्ते’, ‘इनकार’, ‘दोस्ताना’, ‘अग्निपथ’, ‘परिचय’, ‘कालीचरण’, ‘कर्ज’, ‘राम लखन’, ‘सौदागर’, ‘गुलाम’ यांसारख्या 230 हून अधिक चित्रपटांचे एडिटिंग केले होते. ‘इनकार’ या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
अमोल पालेकर दिग्दर्शित कैरी हा त्यांनी एडिट केलेला शेवटचा चित्रपट ठरला. मधुर भांडारकर, विवेक वासवानी यांसारख्या सेलिब्रेटींनी सोशल मीडियाद्वारे वामन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.