कोरोना व्हायरसच्या संकटामुळे राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा यंदा उशिरा करण्यात आली. बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे.‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ आणि ‘पंगा’ या चित्रपटांसाठी कंगनाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर अभिनेता मनोज वाजपेयीला भोंसले चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. तर सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार सुशांत सिंग राजपूतचा चित्रपट छिछोरेला मिळाला आहे.
कंगना राणौतने तिला यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केल्यानंतर ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत. ती म्हणाली की, नुकतेच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत, त्यात मला मणिकर्णिका आणि पंगा चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. मणिकर्णिकाचे दिग्दर्शनही मी केले आहे. मी आमचे लेखक विजयेंद्र सर यांचे आभार मानते. प्रसून सर, म्युझिक डायरेक्टर शंंकर एहसान लॉयजी, निर्माते कमल जैनजी यांची मी आभारी आहे. तसेच पुनित गोएंकाजी यांनी आम्हाला खूप सहकार्य केले. संपूर्ण टीम, बॅकग्राउंड स्कोअर देणारे संचितजी, प्राइम फोकसचे नीरज, अंकिता आणि इतर कलाकार असे सर्वांचे आभार कंगनाने मानले आहेत. तसेच जर कुणाचे नाव घ्यायला विसरले असेल तर मला माफ करा, असेही तिने यात म्हटले आहे. ती पुढे म्हणाली की, या सर्वांनी सहकार्य केले आणि हा चित्रपट यशस्वी बनवला. हा पुरस्कार माझ्यासोबत शेअर करा प्लीज.