युथ आयकॉन आणि बॉलिवुड स्टार आयुष्यमान खुराना एक वैचारिक नेतृत्वही आहे. आपल्या पुरोगामी आणि चर्चेला वाव देणाऱ्या मनोरंजक सिनेमांच्या माध्यमातून तो समाजात ठोस आणि सकारात्मक बदल आणू इच्छितो. आयुष्यमानला टाईम मॅगझिनतर्फे जगातील सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. शिवाय, युनिसेफने त्यांच्या ईव्हीएसी (एंडिंग व्हायलन्स अगेंस्ट चिल्ड्रन) या जागतिक मोहिमेचा सेलिब्रिटी अॅडव्होकेट म्हणून नेमले आहे. राष्ट्रीय तरुण दिनानिमित्त आयुष्यमानने मत मांडले आहे की देशातील तरुणांनीच त्यांच्यावर होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवायला हवा.
"तरुण एका समान विचारधारेने एकत्र येतील आणि मुलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात एकजुटीने लढतील तेव्हाच आपण काही ठोस बदल होण्याची अपेक्षा करू शकतो. विविध स्वरुपातील अत्याचार ओळखण्यास इतरांना साह्य करणे हे काम तरुण फार परिणामकारकरित्या करू शकतात," असे आयुष्यमान म्हणाला.
"रस्त्यावर मुलीची छेड काढणाऱ्या मित्राला टोकणे किंवा दैनंदिन जीवनात आपल्यासोबतच्या इतर मुलांसोबत होणाऱ्या अत्याचाराची नोंद घेण्यासाठी हेल्पलाइनशी संपर्क साधणे, बाधितांना साह्य घेण्यात साथ देणे किंवा पालक, शिक्षक आणि शाळा प्रशासनासमोर आपले म्हणणे मांडणे अशा ठोस कृतीतून तरुण मुले बदल घडवू शकतात."
आयुष्यमानने युनिसेफसोबतच्या 2021 मधील मार्गक्रमाणाची कल्पना दिली. "2021 मध्ये युनिसेफ मुलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात प्रतिसाद आणि ते रोखणे या संदर्भात अधिक जागरुकता, चर्चा आणि सार्वजनिक कृती घडवण्यावर भर देणार आहे. त्याचवेळी या अत्याचारातून वाचलेल्यांना साह्य करण्यासाठीचे उपक्रम आणि सेवा यात अधिक गुंतवणूक व्हायला हवी, त्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे," असे तो म्हणाला.
युनिसेफसोबतच्या सहकार्यातून तो तातडीचे संरक्षण हवे असलेल्या मुलांना साह्य करू शकेल, अशी आशा आयुष्यमानला वाटते. तो म्हणाला, "आमचे लक्ष्य आहे प्रत्येक मुलाला प्रेमळ, सुरक्षित आणि साह्यकारी वातावरणाचे लाभ अगदी बालवयापासून तरुण हेण्यापर्यंत मिळावेत. त्यामुळे ही मुले मानसिक आणि शारीरिकरित्या आरोग्यदायी आणि खंबीर बनतील."
तो पुढे म्हणाला, "मुलांविरोधातील अत्याचार समाजात फार खोलवर रुजले आहे. त्रास देणे, लैंगिक छळ, शारीरिक शिक्षा आणि ऑनलाइन त्रास अशा वेगवेगळ्या स्वरुपात हे अत्याचार होत असतात. बऱ्याचदा त्रास देणारी व्यक्ती मुलांच्या विश्वासातली किंवा ओळखीतीलच असते. यात पालक, कुटुंबातील इतर सदस्य, शेजारी आणि मित्रमंडळींचा समावेश असतो. मुलांविरोधातील अत्याचार थांबवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि आपल्यातील प्रत्येकाने त्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवेत."