कपिल शर्माचा द कपिल शर्मा शो प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. पण या कार्यक्रमाच्या एका दौऱ्याच्या वेळी कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांची भांडणं झाली आणि सुनील, अली असगर यांसारख्या कलाकारांनी या कार्यक्रमाला रामराम ठोकला आणि या कार्यक्रमाला उतरती कळा लागली. सततच्या आजारपणामुळे कपिल अनेकवेळा या कार्यक्रमाचे चित्रीकरण ऐनवेळी रद्द करत होता. त्यामुळे हा कार्यक्रम काही कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय सोनी वाहिनीने घेतला होता. या सगळ्या कारणामुळे कपिलची लोकप्रियता दिवसेंदिवस कमी होत गेली.
कपिलने आता द कपिल शर्मा शोद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. या कार्यक्रमात कृष्णा अभिषेक, भारती सिंग यांसारखे नवीन कलाकार तर किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती, चंदन प्रभाकर, रोशेल राव यांसारखे जुने कलाकार पाहायला मिळत आहेत. तसेच नवज्योत सिंग सिद्धू देखील या सिझनमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. पण या सिझनमध्ये सुनील ग्रोव्हर आणि अली असगर यांची कमतरता सगळ्यांनाच भासत आहे. सध्या हे दोघे कानपूरवाले खुरानाझ या कार्यक्रमात मुख्य भूमिका साकारत आहेत. त्या दोघांनी द कपिल शर्मा शोमध्ये परत यावे अशी सगळ्यांचीच इच्छा आहे.
सुनील या कार्यक्रमात परतणार का याविषयी पंजाब केसरीशी बोलताना नवज्योत सिंग सिद्धू यांनी सांगितले की, कपिल शर्माला मी माझा मुलगा मानतो आणि त्यामुळेच मी या कार्यक्रमात पुन्हा येण्याचे ठरवले. कपिल त्याच्या आयुष्यातील अतिशय वाईट काळातून नुकताच गेला आहे. पण आता त्याची चांगली वेळ आली आहे. सुनील आणि कपिल हे दोघेही माझ्या तितकेच जवळचे आहेत. त्यामुळेच त्या दोघांनी एकत्र यावे असे मला वाटते. सुनीलला स्वतःला या गोष्टीची जाणीव होईल की त्याने परत यावे आणि त्यावेळी कपिल त्याचे स्वागत करायला तयार असेल असे मला वाटते.
सुनील आणि कपिल सध्या एकत्र काम करत नसले तरी खऱ्या आयुष्यात त्यांच्यात खूपच चांगले नाते आहे. कपिलच्या लग्नानंतर सुनीलने त्याला सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देखील दिल्या होत्या.