नवरात्रौत्सवाला सगळीकडे मोठ्या दिमाखात सुरूवात झाली आहे. या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक दिवसाच्या महतीप्रमाणे नऊ रंगांचे कपडे परीधान केले जातात. सध्या या गोष्टीची क्रेझ वाढलेली पाहायला मिळते आहे. यात कॉलेज व कामाला जाणाऱ्या महिलांमध्ये ही रंगाची क्रेझ जास्त पाहायला मिळते. मात्र नऊ रंगाचा ट्रेंड हा आताचा नसल्याचे मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री स्पृहा जोशी सांगते. तसेच तिने या नऊ रंगांचे महत्त्व देखील सांगितले.
स्पृहा जोशी म्हणाली की, नवरात्री उत्सवात नऊ रंगाचे कपडे घालण्याची क्रेझ वाढली आहे. ते फार मोहक वाटते. ही संकल्पना आताच नव्याने उद्यास आली आहे असे नाही. कारण आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांचे नऊ रंग या संकल्पनेच्या मागचे अर्थ खूप चांगले आहेत. रविवार सुर्याचा दिवस म्हणून रंग केशरी असतो. सोमवार चंद्राचा दिवस म्हणून पांढरा असतो. मंगळवार मंगळ ग्रह म्हणून लाल रंग असतो. त्यानंतर बुधवारचा रंग निळा, गुरुवारचा रंग पिवळा व शुक्रवारचा रंग हिरवा असतो. आपल्या संस्कृतीने कायमच रंग व प्रकाश या दोन गोष्टींना जास्त महत्त्व दिले आहे. शेवटी प्रत्येक सणाचा अर्थ हाच असतो की सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे. एकभावनेने काहीतरी एकत्र साजरे करावे आणि आपल्यातील आनंद वाढीस लागावा, हाच यामागे हेतू असतो. यंदाची नवरात्री रंगबेरंगी जाऊ दे अशी माझ्याकडून सदिच्छा.