'नवरी मिळे हिटलरला' ही झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. मालिकेतील एजे-लीलाची जोडी प्रेक्षकांना भावली. सगळे गैरसमज दूर होऊन हळूहळू एजे-लीलाचं नातं फुलताना पाहून चाहतेही सुखावले होते. एजे-लीलामध्ये प्रेम फुलत असतानाच त्यांच्या लव्हस्टोरीला मात्र आता ग्रहण लागणार आहे. 'नवरी मिळे हिटलरला'मध्ये मोठा ट्विस्ट आला आहे.
मालिका रंजक वळणावर असतानाच आता 'नवरी मिळे हिटलरला'मध्ये अभिरामची पहिली पत्नी अंतराची एन्ट्री होणार आहे. 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये एजे-लीलाचा रोमान्स सुरू असतानाच त्याची पहिली पत्नी अंतरा एन्ट्री घेत असल्याचं दिसत आहे. मालिकेत अंतराचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे मालिकेचा हा प्रोमो पाहून चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
"अंतरा एवढ्या उशीरा का आली. आम्हाला वाटलेलं काश्मीरमध्येच येशील", "हे म्हणजे मेलेली व्यक्ती परत जगात दाखवण्यासारखं झालं", "मग तिला आधीच कशाला मारलं", "आता तर लव्हस्टोरी सुरू झाली होती, अंतराला का आणलं", "ही तर मेली होती ना", अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत अंतराच्या भूमिकेत अभिनेत्री माधुरी भारती दिसणार आहे. माधुरीने याआधी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. काही सिनेमांमध्येही ती झळकली आहे. आता अंतराच्या एन्ट्रीने मालिका कोणतं वळण घेणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.