अभिनेत्री शर्मिला शिंदे हा मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये काम करून तिने अभिनयाचा ठसा उमटवला. विविधांगी भूमिका साकारून शर्मिलाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. अभिनयाबरोबरच शर्मिला तिच्या बेधडक स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वासाठीदेखील ओळखली जाते. अनेकदा ती परखडपणे तिची मतं व्यक्त करताना दिसते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शर्मिलाने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरबद्दल भाष्य केलं आहे.
शर्मिलाने नुकतीच सेलिब्रिटी कट्टाला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, "सोशल मीडिया कधीही बंद होऊ शकतो. उद्या जर सोशल मीडिया बंद झाला, तर ही सगळी माणसं जाणार आहेत. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जे क्रिएट करत आहेत. ते अळवावरचं पाणी आहे. सोशल मीडिया बंद झाल्यानंतर त्यांचं अस्तित्व काय राहणार आहे? ते नष्ट होणार आहे. जे एका बटणावर नष्ट होऊ शकतं ते किती महत्त्वाचं आहे? शेवटी एक कलाकार म्हणून तुम्ही काय करू शकता, तेच राहणार आहे. एक कलाकार म्हणून अशा गोष्टींना का महत्त्व द्यायचं? कान्स फिल्म फेस्टिव्हल हा सिनेमा सेलिब्रेट करणारा जगातील सगळ्यात मोठा फेस्टिव्हल आहे. त्या फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर सगळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिसले. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि फिल्म फेस्टिव्हलचा संबंध काय आहे? काहीही गरज नसताना इन्फ्लुएन्सर सगळीकडे जाताना दिसत आहेत. उगाच सगळ्या गोष्टी मिक्स केल्या जात आहेत".
"आर्टिस्ट काहीही करू शकतो. कुठल्याही कलाकाराला तुम्ही सांगितलं तुला सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहायचं आहे. तुला व्हायरल होणाऱ्या १० पोस्ट कराव्या लागतील. तर मला वाटतं कुठलाही कलाकार रातोरात अमेझिंग कंटेट तयार करू शकतो. ते कलाकारासाठी अशक्य नाही. फक्त कलाकार करत नाहीत. कारण, ती गरज वाटत नाही. ते त्याच्यासाठी महत्त्वाचं नाही. मीदेखील सोशल मीडियावर सक्रिय आहे. पण, मी ते माझ्या आनंदासाठी करते. किती लाइक्स, व्ह्युज मिळतील यासाठी मी हे करत नाही. यावर माझं पोट नाही आणि घरही चालत नाही. जो कलाकार वेगवेगळ्या भूमिका करू शकतो. तो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होऊ शकत नाही का? तर सहज होऊ शकतो. पण, ते त्याला करायचं नाहीये," असंही ती पुढे म्हणाली.
शर्मिला 'पुढचं पाऊल', 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली. सध्या ती 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती दुर्गा हे पात्र साकारत आहे. शर्मिलाने अनेक नाटकांमध्येही काम केलं आहे.