Nawazuddin Siddiqui : अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकी सध्या कौटुंबिक वादामुळेच चर्चेत आहे. पत्नी आलिया हिने अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहेत तर त्यानेही पलटवार केला आहे. मात्र या सर्व प्रकरणात त्यांच्या मुलांचं नुकसान होत आहे. हीच बाब मुंबई उच्च न्यायालयाने लक्षात आणून दिली आहे.नवाज आणि त्याची विभक्त पत्नी आलिया १२ वर्षांची मुलगी आणि सात वर्षांचा मुलगा आहे. नवाजुद्दीनने दाखल केलेल्या 'हेबियस कॉर्पस'द्वारे याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने हे निदर्शनास आणून दिले.
न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर आज ही याचिका सुनावणीसाठी आली. त्यावेळी नवाजुद्दीन आणि आलिया यांनी मुलांबाबत एकमेकांशी बोलून तोडगा काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले. याचिककर्त्याला केवळ मुलांच्या शिक्षणाची चिंता आहे. त्यामुळे याचिकाकर्ता आणि प्रतिवादीने एकमेकांशी बोलावे. तसेच याचिकाकर्त्याला मुलांशी संवाद साधता यावा आणि त्यांना भेटता यावे याचा निर्णय घ्यावा. दोघांनी मुलांच्या दृष्टीने यावर तोडगा काढावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
गेल्या काही वर्षांपासून आलिया मुलांसह दुबईत आहे. दोन्ही मुलांचे शिक्षणही तिथेच सुरु होते. मात्र अचानक आलिया मुलांना घेऊन भारतात परतली. यामुळे मुलांचे शिक्षण थांबले आहे. त्यांचे नुकसान होत आहे.शोरा आणि यानी अशी मुलांती नावं आहेत. नवाज त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलत नसल्याचा आरोपही तिने केला होता.