बॉलिवूडला आज नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin siddiqui) हे नाव नवीन राहिलेलं नाही. 'टिकू वेड्स शेरु', 'मिस लवली', 'द लंच बॉक्स', 'बॉम्बे टॉकीज', 'बजरंगी भाईजान' आणि 'सेक्रेड गेम्स' अशा कितीतरी गाजलेल्या सिनेमा, वेबसीरिजमध्ये काम करुन नवाजुद्दीने इंडस्ट्रीत त्याचं स्थान निर्माण केलं आहे. परंतु, एक काळ असा होता जेव्हा त्याला प्रचंड स्ट्रगल करावा लागला. केवळ स्ट्रगलचं नाही तर त्याच्या दिसण्यावरुनही अनेकांनी त्याला ट्रोल केलं. नवाजने एका मुलाखतीमध्ये त्याला सुरुवातीच्या काळात इंडस्ट्रीत कशाप्रकारे वागणूक मिळाली हे सांगितलं.
सुरुवातीच्या काळात अनेक सिनेमांमध्ये नवाजुद्दीने ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम केलं. परंतु, ज्युनिअर आर्टिस्ट असताना त्याला बरीच अवहेलना सहन करावी लागली. एकदा तर मेकअपच्या नावाखाली मेकअप मॅनने त्याच्या चेहऱ्यावर चक्क पावडर फेकली होती. इतकंच नाही तर एकदा पाणी मागूनही पाण्याचे दोन घोट सुद्धा दिले नव्हते असं त्याने सांगितलं. एका सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमात त्याने हा किस्सा शेअर केला होता."आता माझा मेकअप करत असताना मला जुन्या दिवसांची आठवण झाली. ज्यावेळी मी ज्युनिअर आर्टिस्ट होतो. माझ्यासोबत इतरही काही ज्युनिअर आर्टिस्ट होते. एकदा तर आम्हा सगळ्या ज्युनिअर आर्टिस्टला मेकअप मॅनने एका रांगेत उभं केलं आणि आमच्या तोंडावर चक्क पावडर फेकली आणि म्हणाला झाला तुमचा मेकअप",असा किस्सा नवाजुद्दीनने सांगितला.पुढे तो म्हणतो, "ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून मी अनेक भूमिका केल्या आहेत. पण, अॅक्टर म्हणून मिस लवली हा पहिला सिनेमा ठरला. या सिनेमात माझ्या अनेक जुन्या मित्रांनी काम केलं होतं. पण, मी या सिनेमात लीड आहे हे त्यांना माहित नव्हतं. मला पाहिल्यावर अरे तू इथे काय करतोस असं त्यांनी विचारलं. त्यावर मी लीड करतोय सांगितलं. सोबतच आपण यापूर्वी सोबत काम केलंय हे इथे कोणाला बोलू नका असंही आवर्जून सांगितलं."
दरम्यान, ''ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून का करत असताना कधीच लोकांनी चांगली वागणूक दिली नाही'', असंही त्यांनी सांगितलं. सोबतच "एकदा तहान लागल्यामुळे पाणी मागितलं होतं पण माझ्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आलं. मला पाण्याचे दोन घोटही दिले नाहीत. काही सिनेमांच्या सेटवर तर आमच्यासाठी जेवण्यासाठीही वेगळी सोय केली जायची. आणि, आम्ही लीड कलाकारांच्या जेवण्याच्या व्यवस्थेजवळ गेल्यानंतर आमची कॉलर पकडून बाजूला केलं जायचं'', असंही त्याने सांगितलं.