Join us

नवाझुद्दीन सिद्दीकी सांगतोय या गोष्टीने बदलले माझे संपूर्ण आयुष्य

By प्राजक्ता चिटणीस | Published: November 03, 2019 6:00 AM

नवाझुद्दीनने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला खूप स्ट्रगल केला आहे. पण केवळ एका गोष्टीने त्याचे संपूर्ण आयुष्य बदलले असे त्याने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

ठळक मुद्देगँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटाच्या आधी मी एका चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. पण अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटाने एका नवीन जगात प्रवेश करण्याचा माझा मार्ग खुला केला. या चित्रपटाने माझे संपूर्ण आयुष्यच बदलले. 

नवाझुद्दीनने बॉलिवूडमध्ये नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्याने त्याच्या करियरच्या सुरुवातीला प्रचंड स्ट्रगल केला आहे. त्याचा मोतीचूर चक्कनाचूर हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्याशी मारलेल्या गप्पा...

मोतीचूर चक्कनाचूर या चित्रपटाचे शीर्षक ऐकल्यावर तुझ्या मनात सगळ्यात पहिल्यांदा काय विचार आला होता?शादी का लड्डू जो खाए पछताए, जो न खाए पछताए असे आपल्याकडे म्हटले जाते. याच संकल्पनेवर आधारित या चित्रपटाचे शीर्षक असून या चित्रपटातील नायक लग्न करण्यास उतावीळ झाला आहे तर या चित्रपटातील नायिकेला एखाद्या परदेशातील मुलासोबतच लग्न करायचे आहे. या चित्रपटाची ही पटकथा खूपच रंजक असल्याने ऐकताच क्षणी मी या चित्रपटात काम करायचे ठरवले. आपल्याला रोजच्या आयुष्यात देखील या चित्रपटात असलेल्या व्यक्तिरेखांप्रमाणे लोक पाहायला मिळतात. या व्यक्तिरेखा अगदी खऱ्याखुऱ्या असल्याने त्या प्रेक्षकांना नक्कीच आवडतील याची मला खात्री आहे.

या चित्रपटात अथिया शेट्टी तुझ्या नायिकेच्या भूमिकेत आहे, तिच्यासोबत तुझी केमिस्ट्री कशी जमून आली?अथियाने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. विशेषतः तिने या चित्रपटासाठी बुंदेलखंडची भाषा शिकली आहे. तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. केवळ तिची उंची जास्त असल्याने रोमँटिक दृश्य चित्रीत करताना मला उंचावर उभे राहावे लागत असे. 

तू तुझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला खूप स्ट्रगल केला आहेस, तुझ्या करियरचा टर्निंग पॉईंट कोणता होता असे तुला वाटते?गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटाच्या आधी मी एका चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. पण अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटाने एका नवीन जगात प्रवेश करण्याचा माझा मार्ग खुला केला. या चित्रपटाने माझे संपूर्ण आयुष्यच बदलले. 

आज तुला मिळालेल्या यशानंतरही चित्रपट प्रदर्शित व्हायच्या दिवशी तू चिंतेत असतोस का?मी कधीच शुक्रवारचे टेन्शन घेत नाही. माझे काम केवळ अभिनय करणे आहे असे मला वाटते. अनेकवेळा माझे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरत नाहीत. पण काही चित्रपट हे बॉक्स ऑफिससाठी नसतात असे मला वाटते.

तू एक खूप चांगला कूक आहेस हे खरे आहे का?माझ्या स्ट्रगलिंगच्या दिवसांत माझ्याकडे राहायला घर नव्हते. एवढेच काय तर घराचे भाडं द्यायला देखील पैसे नसायचे. त्या वेळात मी माझ्या काही मित्रांसोबत राहायचो. भाडे देण्याचे पैसे माझ्याकडे नसल्याने मी त्यांच्या सगळ्यांसाठी जेवण बनवायचो. मी खूपच चांगला कूक आहे. मी आजही मला वेळ मिळाला तर जेवण बनवतो आणि माझ्या त्या जुन्या मित्रांना जेवायला बोलवतो.

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकी