आज बॉलिवूडच्या सर्वोत्तम कलाकारांची यादी करायची म्हटले तर नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हे नाव त्यात ठळकपणे उठून दिसेल. खरं तर नवाजकडे ना चेहरा होता, ना फिजिक्स. पण फक्त आणि फक्त दमदार अभिनयाच्या जोरावर नवाजने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. अर्थात यासाठी त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. त्याचा इथवरचं प्रवास सोपा नव्हता.
नुकत्याच एका मुलाखतीत नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितले की, अनेक वर्षांपासून त्याला वाटत होते की तो दिसायला चांगला नाही. बॉलीवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीनने त्याच्या लूक्सबद्दल सांगितले. त्याने सांगितले की तो फेअरनेस क्रीमच्या फंदातही पडला होता. मात्र, त्याला याचा कोणताही फायदा झाला नाही. नवाजुद्दीन म्हणाला, “माझ्या रंगामुळे करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मला असुरक्षित वाटायचे. मी खूप क्रीम लावले पण फरक पडला नाही. नंतर मला समजले की ते पूर्वीसारखेच आहे, काहीही बदललेले नाही.”
पुढे तो म्हणाला, ''मी बराच काळ विश्वास ठेवत होतो की मी चांगला दिसणारा माणूस नाही. पण जेव्हा मी बाहेर गेलो तेव्हा मला समजले की मी ठीक आहे, माझा चेहरा ठीक आहे. तुमच्या आजूबाजूच्या लोकांमुळे असुरक्षित वाटू लागले होते, असे नवाजुद्दीन म्हणाला. अभिनेता म्हणाला, “तुम्ही कसे दिसत आहात याबद्दल तुम्हाला आत्मविश्वास असणं खूप महत्वाचे आहे.”
नवाजुद्दीनला सुरुवातीच्या काळात मिळायचे ते छोटे-मोठे रोल. कुणीच त्याला चांगल्या भूमिका देईना. पाकिटमार किंवा वेटर इतक्यात भूमिका त्याला ऑफर होत होत्या. पण अशाच एका छोट्याशा भूमिकेने, छोट्याशा सीनने त्याचे आयुष्य बदलले. होय, अनुराग कश्यपच्या ‘ब्लॅक फ्रायडे’ या सिनेमात असगर मुकादमची एक छोटीशी भूमिका त्याच्या वाट्याला आली. या छोट्याशा भूमिकेतही नवाजने असा काही जीव ओतला की, अनुराग कश्यप एकदम त्याच्यावर फिदा झाला होता. पण याच छोट्या छोट्या भूमिकांनी नवाजला मोठे बनवले. इतके मोठे की, आज बॉलिवूडच्या आघाडीच्या आणि बिझी कलाकारांमध्ये त्याचे नाव घेतले जाते.