Join us

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भावाला पोलिसांकडून अटक! समोर आलं मोठं प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 11:35 AM

नवाजुद्दीन सिद्दीकीचा मोठा भाऊ अयाजुद्दीन सिद्दीकीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचं कारणही समोर आलं आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याच्या कुटुंबातील व्यक्तीबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीचा मोठा भाऊ अयाजुद्दीन सिद्दीकीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचं कारणही समोर आलं आहे. बनावट कागदपत्रांच्या प्रकरणात पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. 

डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी(२२ मे) नवाजुद्दीन सिद्दीकीचा भाऊ अयाजुद्दीन याला उत्तर प्रदेश पोलिसांनी मुजफ्फरनगर येथून ताब्यात घेतलं. अयाजुद्दीनने जिल्हा मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या नावाने अवैधरित्या बनावट नोटीस जारी केली होती. जावेद इकबाल या व्यक्तीला ही नोटीस पाठविण्यात आली होती. शेतजमीनीवरुन असलेल्या वादामुळे नवाजुद्दीनच्या भावाने हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. पण, नंतर ती नोटीस बनावट असल्याचं समोर आलं. त्यानंतर नवाजुद्दीनच्या भावाविरोधात जिल्हा मॅजिस्ट्रेट कोर्टात तक्रार नोंदविण्यात आली. त्याच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम 420, 467, 468 आणि 471 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याआधी एका सोशल मीडिया पोस्टमुळे नवाजुद्दीन सिद्दीकीचा भाऊ चर्चेत आला होता. २०१८ मध्ये अयाजुद्दीनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आक्षेपार्ह फोटो पोस्ट केला होता. यातून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. याबाबत एएनआयशी बोलताना त्याने सांगितलं होतं की, "एका व्यक्तीने भगवान शंकराचा आक्षेपार्ह फोटो पोस्ट केला होता. त्याबाबत मी पोस्ट शेअर केली होती. अशा पोस्ट शेअर करू नका. त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. असं मी म्हटलं होतं. पण, त्या व्यक्तीऐवजी माझ्याविरोधातच गुन्हा दाखल करण्यात आला". 

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकीसेलिब्रिटी