काही दिवसांपूर्वी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एक रेस आयोजित करण्यात आली होती. या रेसचे वैशिष्ट्य म्हणजे या रेसमध्ये धावणाऱ्या सगळ्या स्त्रियांनी नऊवारी साड्या घातल्या होत्या, केसाचे आंबाडे घातले होते, मराठमोळे दागिने परिधान केले होते. यामुळे सॅन फ्रान्सिस्कोवासीयांना मराठी संस्कृती अनुभवायला मिळाली. या रेसचे आयोजन अनिता मोकाशी या मराठी मुलीने केले होते. अनिताने आयोजित केलेल्या या रेसचे सगळ्यांनी खूपच कौतुक केले. या रेसबद्दल अनिताने ‘सीएनएक्स’सोबत अगदी दिलखुलास गप्पा केल्या, त्याचा हा सारांश...प्रश्न : नऊवारी घालून स्त्रिया रेसमध्ये सहभागी होऊ शकतात ही संकल्पना तुला कशी सुचली?मी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये नेहमीच बे टू ब्रेकर्स नावाची एक रेस आयोजित करते. त्यामध्ये तुम्ही कोणतेही कॉस्च्युम घालून रेसमध्ये सहभागी होऊ शकता. जगभरातील अनेक जण या रेसमध्ये नेहमीच सहभागी होतात. गेल्या वर्षी दोन विदेशी स्त्रिया साडी घालून या रेसमध्ये धावल्या होत्या. तेव्हाच पुढील वर्षी आपण सगळ्या स्त्रियांना नऊवारी घालायला सांगू असा विचार माझ्या मनात आला. लोकांनीही त्यात रस दाखवला आणि आम्ही प्लानिंग करायला सुरुवात केली. आम्हाला पाहून अनेक विदेशींनी आम्ही खूप छान दिसत आहोत, असे आमचे कौतुक केले. प्रश्न : तुला नऊवारीविषयी इतके आकर्षण का आहे?मी मुंबईत लहानाची मोठी झाल्यामुळे मला नऊवारी खूप आवडते. आपल्या महाराष्ट्रात प्राचीन काळापासून नऊवारी साडी घातली जात आहे. महाराष्ट्रीय स्त्री आणि नऊवारी हे एक प्रकारचे समीकरणच झालेले आहे. सध्या तर फॅशन शोमध्येही मॉडेल आपल्याला नऊवारीमध्ये पाहायला मिळते. आजही अनेक स्त्रिया नऊवारी रोज परिधान करतात. प्रश्न : कॅलिफोर्नियासारख्या शहरात नऊवारी आणि महाराष्ट्रीय दागिन्यांची जमवाजमव कशी केली?रेसमध्ये सहभागी होणाऱ्या स्त्रियांमध्ये ८० टक्के स्त्रिया या मराठी नव्हत्या. त्यामुळे त्यांना सगळ्यांत पहिल्यांदा मला नऊवारी साडीविषयी पूर्णपणे माहिती द्यावी लागली. १५ स्त्रियांसाठी मी टेक्सासमधील एका दुकानातून भाड्याने नऊवारी मागवल्या. त्यानंतर त्यावर कशा प्रकारे दागिने घातले जातात याचे फोटो सगळ्यांना दाखवले. सगळ्यांनी त्यावर दागिने घेतले. रेसच्या दिवशी तर सगळेच खूप छान दिसत होते. प्रश्न : भारताबाहेर राहणाऱ्या भारतीयांनी अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे किती महत्त्वाचे आहे असे तुला वाटते?तुम्ही जेव्हा भारतापासून खूप दूर असता तेव्हा तुमच्या आजूबाजूला असणारे तुमचे भारतीय मित्र हाच तुमचा परिवार असतो. आम्ही सुरुवातीला जेव्हा कॅलिफोर्नियाला राहायला आलो त्या वेळी माझ्या पतीचे एक मित्र येथे पहिल्यापासून राहत होते. ते नेहमीच आम्हाला सणांना घरी बोलवायचे. विशेष म्हणजे मी येथे आल्यापासून केवळ मराठी सण साजरे करत नाही, तर भारतातील विविध प्रांतांत साजरे केले जाणारे सगळे सण आम्ही साजरे करतो. त्यामुळे आता मी खऱ्या अर्थाने पूर्ण भारतीय झालेली आहे. प्रश्न : भारतापासून दूर राहत असल्याने मराठी असल्याचा अधिक अभिमान वाटायला लागला आहे का?नक्कीच. भारतात असताना मी गुढीपाडव्याच्या दिवशी केवळ गुढीच्या पाया पडायची, श्रीखंड-पुरी खायची आणि मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जायची. पण येथे आल्यावर मी गुढीपाढवा कसा साजरा केला जातो? गुढी बांधण्यासाठी काय काय लागते? या सगळ्या गोष्टी शिकले. भारतात असताना मी मराठी चित्रपट कधी पाहिलेले मला आठवत नाहीत. पण येथे मराठी चित्रपट चित्रपटगृहात लागल्यावर मी लगेचच तो बघून येते.प्रश्न : तुला स्वत:ला १०० साडी पॅक्ट या ट्रेंडविषयी काय वाटते? आपली आई, आजी जितक्या उत्साहाने साडी घालायच्या, तितक्याच आनंदाने आजच्या मुली साडी नेसताना आपल्याला पाहायला मिळतात. १०० साडी पॅक्टविषयी मी बीबीसीवर एक लेख वाचलेला मला चांगलाच आठवत आहे. यामुळे मला साडी घालायला आवडते याचा मला प्रचंड अभिमान आहे.
- janhavi.samant@lokmat.com