दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा हिने मोठ्या थाटात चित्रपट निर्माता विग्नेश शिवन याच्यासोबत लग्न केलं. ९ जून रोजी चेन्नईतील महाबलीपूरम येथील एका रेसॉर्टमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा रंगला. या लग्नसोहळ्यात साऊथ कलाकारांसह अभिनेता शाहरुख खानदेखील उपस्थित होता. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या या लग्नसोहळ्याची चर्चा आहे. सध्या सोशल मीडियावर नयनतारा आणि विग्नेश यांच्या लग्नाचे काही फोटो व्हायरल होत आहेत. यात एक फोटो तिरुपती बालाजी मंदिरातील असून या फोटोमुळे सध्या दोघांवर ट्रोल होण्याची वेळ आली आहे.
सध्या सोशल मीडियावर नयनतारा आणि विग्नेश यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये हे नवं दाम्पत्य भगवान व्यंकटेश्वरच्या कल्याणोत्सवात सहभागी झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे देवदर्शनासाठी गेलेल्या या जोडीने तिथे प्रचंड फोटो काढले. इतकंच नाही तर यावेळी फोटोच्या नादात दोघांनाही पायातील चप्पल काढायचंही भान राहिलं नाही. त्यामुळे पायात चप्पल घालून या दोघांनी मंदिराच्या आवारात प्रवेश केला. ज्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं. या प्रकरणी नयनतारा व विग्नेशने जाहीरपणे नेटकऱ्यांची माफी मागत झालेल्या चुकीविषयी स्पष्टीकरण दिलं.
संपत्तीच्या बाबतीत बायको ठरणार वरचढ; जाणून घ्या, विग्नेश-नयनताराचं Net worth
मंदिर प्रशासनाने पाठवली कायदेशीर नोटीस
मंदिराच्या परिसरात चप्पल घालून प्रवेश केल्यामुळे मंदिर प्रशासनाने या नव दाम्पत्याला कायदेशीर नोटीस बजावली. ही नोटीस पाहिल्यानंतर दोघांनीही जाहीरपणे माफी मागितली.
"आम्हाला तिरुपती या तिर्थक्षेत्रीच लग्न करायचं होतं. पण, ते शक्य झालं नाही त्यामुळे लग्नानंतर आम्ही लगेच देवदर्शनासाठी गेलो. यावेळी आम्हाला पाहून लोकांनी एकच गर्दी केली. त्यामुळे या उडालेल्या गोंधळात चप्पल बाहेर काढावी हे आमच्या लक्षात आलं नाही. म्हणूनच, आमच्याकडून जी चूक झाली त्याप्रकरणी आम्ही माफी मागतो. पण, आमची तिरुपती देवावर प्रचंड श्रद्धा आहे. आम्हाला कोणचाही भावना दुखवायच्या नव्हत्या", असं म्हणत विग्नेशने जाहीरपणे माफी मागितली.