मुंबई – झी मराठीवरील खुपते तिथे गुप्ते ही मालिका चांगलीच गाजतेय. राजकीय नेत्यांच्या मुलाखती आणि त्यांना विचारले जाणारे खोचक प्रश्न यामुळे मालिकाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, नितीन गडकरी, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता खासदार अमोल कोल्हे यांची मुलाखत सूत्रसंचालक अवधूत गुप्ते यांनी घेतली. या मुलाखतीचे टिझर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. त्यात अमोल कोल्हेंनी राज ठाकरेंना आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.
शरद पवारांनी महाराष्ट्रात जातीचे राजकारण आणले असा आरोप सातत्याने राज ठाकरे यांनी जाहीर व्यासपीठावरून केला आहे. त्यावर गुप्ते यांनी खासदार अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारला त्यावर ते म्हणाले की, जे लोक शरद पवारांवर जातीच्या राजकारणाचा आरोप करतात तर ज्या पवारांनी ३३ टक्के महिलांसाठी आरक्षण आणले. तेव्हा शरद पवारांनी ती महिला कोणत्या जातीची असणार आहे हा विचार केला नाही. ज्या पवारांनी हिंजवडीत आयटी पार्क उभारले. तिथे काम करणारा २० वर्षाचा तरूण शरद पवारांनी महाराष्ट्रात काय केले असा प्रश्न विचारतो. ज्या माणसाने हे सगळे आणले त्याला तुम्ही असं म्हणणार? असा सवाल कोल्हेंनी विचारला आहे.
त्याचसोबत या मुलाखतीवेळी गुप्ते यांनी कोल्हेंना बॉक्समधील औषधांची पाकिटे काढून ती औषधे कोणत्या नेत्याला पाठवाल असं विचारलं. या बॉक्समधून सुरूवातीला डोकेदुखीची गोळी आली ती गोळी पाहून कोल्हेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नाव सांगितले तेव्हा प्रेक्षकांमध्ये जोरदार हशा पिकला. त्यानंतर दुसरी गोळी स्मरणशक्ती वाढवायचे औषध पाहून कोल्हेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेतले. वर्षाला २ कोटी रोजगार आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या मोदींच्या घोषणेची आठवण करून देत ही गोळी मोदींना पाठवणे गरजेचे आहे असं सांगत कोल्हेंनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.
अमोल कोल्हेंनी केला 'लोकशाही'ला फोन
या एपिसोडमध्ये खासदार अमोल कोल्हेंनी प्रतिकात्मक फोन लोकशाहीला लावला. ते म्हणाले की, हॅलो, लोकशाही ना, आवाज थोडा खाली गेला म्हणून विचारला. कसं आहे ना तू असण्यात, तू टिकण्यात १४० कोटी भारतीयांचे भवितव्य अवलंबून आहे. म्हणून काही प्रश्न मनात आले ते विचारावं वाटलं. प्रश्न विचारण्याचा अधिकार तसा घटनेने दिलाय. पण ते विचारण्याचा मुभा आणि मोकळीक आता नाही. कारण प्रश्न विचारले तर ‘टोल’धाड येते आणि आमच्या मस्तकावर देशद्रोहाचा शिक्का मारून जाते. सियाचिनला -२० डिग्रीमध्ये मुलगा देशाच्या सीमांचे रक्षण करत असतो तर त्याचा बाप दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत त्याच्या न्यायहक्कांसाठी आंदोलन करत असतो आणि त्या आंदोलकांना मग्रूर सत्ताधाऱ्यांच्या गाडीखाली निष्ठूर चिरडले जाते तेव्हा हा प्रश्न निर्माण होतो कुठल्या तोंडाने जय जवान, जय किसान म्हणायचं? असा संवाद कोल्हेंनी साधला.