अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. शनिवारी रात्री दसऱ्याच्या दिवशी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित केलं. बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख यांनी संताप व्यक्त केला आहे.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखने ट्वीट केलं आहे. "बाबा सिद्दिकी यांच्या निधनाबद्दल कळताच मला धक्का बसला आहे. मला अत्यंत दु:ख होत आहे. झीशान सिद्दिकी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. या कठीण काळात देव त्यांना शक्ती देवो. या गुन्ह्यातील गुन्हेगारांना कोर्टात खेचलं पाहिजे", असं रितेशने ट्विटमध्ये म्हटलं आहे.
बाबा सिद्दिकी यांचे बॉलिवूड सेलिब्रिटींशी जवळचे संबंध होते. त्यांच्या इफ्तार पार्टीला बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावायचे. त्यांच्या हत्येनंतर बॉलिवूड सेलिब्रिटींना धक्का बसला आहे. बाबा सिद्दिकी यांच्याबद्दल कळताच शिल्पा शेट्टी, संजय दत्त, सलमान खान या सेलिब्रिटींनी लिलावती रुग्णालयात धाव घेतली होती.
नेमकं काय घडलं?
बाबा सिद्दिकी हे त्यांचे पुत्र आणि आमदार झिशान सिद्दिकी यांच्या वांद्रे पूर्व परिसरातील खेरनगर येथील कार्यालयाजवळ थांबले होते. यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या सिद्दिकी यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, राज्याचं मंत्रिपद भूषवलेल्या बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने राज्यभर खळबळ उडाली असून कायदा-सुव्यस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.