बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचा सगळीकडे बोलबाला आहे. बॉक्स ऑफिसवरील इतर चित्रपटांना ‘जवान’ तगडी टक्कर देताना दिसत आहे. थिएटरमधील या चित्रपटाचे शो हाऊसफूल होत आहेत. शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. तगडी स्टारकास्ट आणि उत्तम कथा असलेल्या या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक होत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही ‘जवान’ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शाहरुख आणि इतर कलाकारांचं कौतुक केलं आहे. सर्वत्र ‘जवान’चा बोलबाला सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘जवान’ चित्रपट फ्री मध्ये दाखविण्याचा निर्णय घेतला आहे.
कॉलेज जीवनातील विद्यार्थ्यांना जवान चित्रपट फ्री मध्ये दाखवणार असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं आहे. याबाबत त्यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये १८ ते २५ वयोगटातील मुलांना ‘जवान’ चित्रपटाची तिकिटे आव्हाडांकडून फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कळवा आणि मुंब्रामधील कॉलेज विद्यार्थ्यांना हा चित्रपट फ्रीमध्ये दाखविण्यात येणार आहे. “पहिली बॅच उद्या संध्याकाळी ७ वाजता ‘जवान’ चित्रपटाचा शो ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये जाऊन बघतील,” असं आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
अटली कुमार दिग्दर्शित ‘जवान’ चित्रपटात शाहरुख खानने सैनिक आणि जेलर अशी दुहेरी भूमिका साकारली आहे. शाहरुखबरोबर या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा, विजय सेतुपथी, दीपिका पदुकोण या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओकही जवानमध्ये झळकली आहे.