रोहित पवार यांनी पाहिला '12th Fail' सिनेमा, मोजक्याच शब्दांत पोस्ट करत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 01:14 PM2024-01-18T13:14:42+5:302024-01-18T13:17:47+5:30
'12 वी फेल' या सिनेमातील विक्रांतच्या कामाने सर्वांना थक्क केलं आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विक्रांत मेसीचा बहुचर्चित चित्रपट '12th Fail' हा 27 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यानंतर '12th Fail' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली. ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर देखील या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. '12 वी फेल' या सिनेमातील विक्रांतच्या कामाने सर्वांना थक्क केलं आहे. त्यांचं कौतुक करताना चाहते आणि सेलिब्रेटी थकत नाही आहेत. आता राजकीय नेत्यांना देखील या सिनेमाने आकर्षित केले आहे. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील '12th Fail' चित्रपट पाहिला.
रोहित पवार यांनी '12th Fail' चित्रपटाचं कौतुक केलं आणि पोस्टद्वारे सरकारकडे एक मागणी केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहलं,'सामान्य कुटुंबातील मुलांना कसा संघर्ष करावा लागतो, किती कष्ट घ्यावे लागतात हे दाखवणारा सद्यस्थितीवरचा #12thFailMovie हा #OTT प्लॅटफॉर्मवर पाहिला. सामान्य कुटुंबातील मुलांचा हा संघर्ष प्रत्यक्ष दिसत नसला तरी किमान सिनेमात तरी पाहून कळेल, म्हणून सरकारमध्ये बसलेल्या सर्वांनीच हा सिनेमा पाहिला पाहिजे. तरच ते मुलांबाबत #serious होतील, अशी अपेक्षा करू'. रोहित पवार यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
सामान्य कुटुंबातील मुलांना कसा संघर्ष करावा लागतो, किती कष्ट घ्यावे लागतात हे दाखवणारा सद्यस्थितीवरचा #12thFailMovie हा #OTT प्लॅटफॉर्मवर पाहिला. सामान्य कुटुंबातील मुलांचा हा संघर्ष प्रत्यक्ष दिसत नसला तरी किमान सिनेमात तरी पाहून कळेल, म्हणून सरकारमध्ये बसलेल्या सर्वांनीच हा… pic.twitter.com/jzb4ZC0lTs
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 17, 2024
'12वी फेल' चित्रपटाचे दिग्दर्शन विधू विनोद चोप्रा यांनी केले. या चित्रपटात विक्रांत मेसी आणि मेधा शंकर यांच्याशिवाय अनंत व्ही जोशी आणि अंशुमन पुष्कर यांनी देखील महत्वाची भूमिका साकारली. या सिनेमाची गोष्ट खूपच भावनिक आहे. आयपीएस मनोज शर्मा यांच्या संघर्षाची, जिद्दीची, प्रामाणिकपणाची, चिकाटीची, स्वाभिमानाची आणि अपार कष्टांची ही कथा आहे. तसेच देशातील शिक्षण व्यवस्था, लोकांची विचारसरणी आणि व्यवस्थेवरही हा सिनेमा भाष्य करतो. सर्वत्र या सिनेमाचं कौतुक सुरू आहे.