- Aboli Kulkarni‘भारतीय’,‘लोकमान्य’, ‘कट्यार काळजात घुसली’ या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारा हरहुन्नरी, अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे याचा आगामी चित्रपट ‘कंडिशन्स अप्लाय-अटी लागू’ ७ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘कंडिशन्स अप्लाय’ या आगामी चित्रपटाच्या टीमने लोकमत कार्यालयाला भेट दिली. नाटक ते चित्रपट असा प्रवास करणाऱ्या सुबोध भावेसोबत चित्रपटासंदर्भात मारलेल्या गप्पा...तू स्क्रीप्ट निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार करतोस?- मी स्क्रीप्ट निवडतांना दिग्दर्शकाचा विचार करतो. चित्रपटाचा दिग्दर्शक कोण आहे? चित्रपटाचा विषय काय आहे? या सर्व गोष्टी माझ्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. एकदा केलेला विषय मी पुन्हा करत नाही. भूमिका वेगळी असावी. त्या भूमिकेतून काहीतरी शिकायला मिळावे, असाच मी विचार करतो. त्यातल्या त्यात गिरीश मोहिते जर असतील तर मी डोळे झाकून विश्वास ठेवतो. कधी कधी असं होतं की, अनोळखी दिग्दर्शक तुमच्याकडे स्क्रीप्ट घेऊन येतात. मग मात्र, मी स्क्रीप्ट पाहणं गरजेचं मानतो. कलाकारांसाठी स्टेज किंवा सेट किती महत्त्वाचा असतो?- कलाकाराचे मायबाप म्हणजे रंगमंच. प्रत्येक कलाकाराची सुरूवातच रंगभूमीवरून होत असते. ज्या रंगमंचाने आपल्याला प्रसिद्धी दिली, अभिनयासाठी बळ दिले त्या रंगमंचाला खरंतर कलाकार कधीच विसरू शकत नाहीत. आयुष्यात तुम्ही कुठल्याही स्टेजला जा, पण ज्या स्टेजमुळे तुम्ही उभे आहात त्या स्टेजचे स्मरण आणि नमन करायला विसरू नका. कलाकार म्हणून मी देखील रंगमंचावर तुफान प्रेम केलं. आधुनिक तंत्रज्ञानामुळे नव्या प्रकारचे सिनेमे, कन्सेप्ट पाहावयास मिळत आहेत, याविषयी काय सांगशील? - कॅमेरे आता अप्रतिम दर्जाचे आले आहेत. पूर्वी मेकअप खूप करायला लागायचे. परंतु, आता कॉम्प्युटर आणि तंत्रज्ञानामुळे चेहऱ्यावरील पुरळ लपवता येतात. पोट सुटले असेल तरी सिक्स पॅक दाखवता येऊ शकतात. आता चित्रपटात केवळ तंत्रज्ञानामुळे स्टेडिअम देखील भरलेले दाखवता येते. त्यामुळेच बदलत्या तंत्रज्ञानासोबत कलाकारानेही बदलायलाच पाहिजे. तुझ्या ‘कंडिशन्स अप्लाय’ या सिनेमातील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?- अभयची व्यक्तिरेखा मी या चित्रपटात करतो आहे. अभय हा एकलकोंडा, स्वत:मध्ये मग्न राहणारा असा असतो. आयुष्यात त्याला आलेल्या अनुभवामुळे त्याचा स्वभाव असा झाला असावा. त्याला लग्न करायचे नाही. त्याच्या आयुष्यात अनेक प्रॉब्लेम्स आहेत. अभयची भूमिका करताना मला मजा आली. काही दिवस वेगळे विचार असलेल्या व्यक्तीला मला स्वत:मध्ये सामावून घेता आले, याचा मला आनंद आहे.चित्रपटाच्या नव्या थीमबद्दल काय वाटते? प्रेक्षकांना ही कन्सेप्ट आवडेल का?- काळ बदलला आणि त्याचबरोबर लग्न व संसाराच्या व्याख्याही बदलल्या. या सर्वांचे मूळ असलेलं प्रेम मात्र तसंच राहिलं. प्रेमाच्या नव्या कल्पनांचा स्वीकार आजची तरुणाई बेधडकपणे करू लागली आहे. लग्न न करता एकत्र राहण्याचा ‘लिव्ह इन’ रिलेशनशिपचा पर्यायही आजची पिढी स्वीकारू लागली. ही स्टोरी आजच्या युवा पिढीचीच आहे. त्यामुळे अर्थात नव्या पिढीला नक्की आवडेल. नवा विषय, प्रश्न, संकल्पना मांडण्याचा हा केवळ एक प्रयत्न आहे. उगीचच सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट नाही, तर हा एक रोमँटिक चित्रपट आहे. ग्रामीण भागापर्यंत चित्रपट किंवा नाटके पोहोचवण्यासाठी काय करता येईल?- नाटके किंवा चित्रपट ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक गोष्टी करता येऊ शकतात. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु पुर्वी वर्तमानपत्राच्या अनेक पुरवण्या अगदी गावागावात जायच्या, त्यामध्ये नाटक आणि सिनेमाच्या जाहिराती असायच्या. मग लोकांना समजायचे असे नाटक आता येणार आहे. लोकांनी पैसे खर्च करून सिनेमाला जायचे आणि जर तो चित्रपट वाईट निघाला तर लोकांना पश्चाताप नक्कीच होतो. पूर्वी परिक्षणे पाहुन लोक नाटक, सिनेमा पाहायला जायचे. आता निर्मातेदेखील ग्रामीण भागात जायला घाबरतात. पुण्या-मुंबईमध्ये ते दीड-दोनशे प्रयोग करतात आणि थांबतात. आता कलाकारदेखील मालिकांमध्ये काम करताना नाटकांचे प्रयोग करतात. त्यामुळे त्यांना आठ दिवसांचे दौरे करता येत नाहीत. कलाकार नाटकांच्या दौऱ्यांसाठी वेळ देऊ शकत नाहीत. परंतु, ही परिस्थिती बदलण्यासाठी काहीतरी करायलाच पाहिजे.
‘भूमिकेला हवी नावीन्याची झालर!’
By admin | Published: June 18, 2017 2:44 AM