बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) म्हणजे आपल्या अटींवर आयुष्य जगणारी महिला. नुकतंच नीना यांचे ‘सच कहूं तो’ हे आत्मचरित्र प्रकाशित झालं आणि नीना चर्चेत आल्या. अलीकडे नीना गुप्ता यांनी गुलजार (Gulzar) यांची भेट घेत त्यांना हे पुस्तक भेट म्हणून दिलं. या भेटीचा एक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आणि या व्हिडीओमुळे नीना ट्रोल झाल्यात. होय, त्यांच्या कपड्यांवरून युजर्सनी नको त्या कमेंट्स केल्या. आता या ट्रोलर्सला नीनांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलल्या. मी सोशल मीडियावर ट्रोल झाले, असं लोक म्हणतात तेव्हा ट्रोलिंगची नेमकी व्याख्या काय, हेच मला कळतं नाही. खूप सा-या लोकांनी माझ्यावर टीका केली आहे का तर नाही. अनेकांनी माझं कौतुकच केलं आहे. मग मी 2-4 लोकांची पर्वा का करू? या 2-4 लोकांच्या टीकेनं मला काहीही फरक पडत नाही. कारण त्यांच्यापेक्षा माझं कौतुक करणा-यांची संख्या अधिक आहे, असं नीना म्हणाल्या.
काल परवा नीना गुप्ता यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर गुलजार यांच्या भेटीचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत नीना गुप्ता गुलजार यांना पुस्तक भेट म्हणून देताना दिसल्या होत्या. या व्हिडीओत नीना गुप्ता यांनी निळ्या रंगाची शॉर्ट्स आणि शर्ट परिधान केल्याचं दिसतंय. त्याचा हा व्हिडीओ पाहून अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी नीना गुप्ता यांचं कौतुक केलंय. काही नेटकºयांनी मात्र त्यांच्या या लूकवर टीका करत त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय.‘गुलजार साहेबांकडे जाताना तुम्ही साडी परिधान करून जायला हवं होतं. कारण शेवटी गुलजार साहेब हे गुलजार साहेब आहेत, असं एका युजरनं लिहिलं होतं. तर अनेकांनी नीना यांना वयाचा विचार करून वागण्याचा सल्ला दिला होता.