ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी (Neena Kulkarni) यांनी मराठी, हिंदी मालिका, सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. लवकरच त्यांचा 'द सिग्नेचर' सिनेमा रिलीज होतोय. अनुपम खेर यांच्यासोबत त्यांनी स्क्रीन शेअर केली आहे. दरम्यान नीना या सोशल मीडियावरही सक्रीय असतात. नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. नीना कुळकर्णी यांचं निधन झाल्याची एका युट्यूब चॅनलने अफवा पसरवली होती. त्यावर त्यांनी पोस्ट शेअर करत या अफवेचं खंडन केलं आहे.
सोशल मीडियावर कधी काय पसरेल सांगता येत नाही. अनेकदा जिवंत माणसांनाही थेट मृत घोषित केलं जातं. ते व्हायरलही होतं. खात्री न करता अशा बातम्या दिल्या जातात. याचा त्या व्यक्तीवर आणि तिच्या कुटुंबावर काय परिणाम होतो याचा कोणी विचार करत नाही. दरम्यान नीना कुळकर्णी यांच्याही निधनाची बातमी एका युट्यूब चॅनलवर आली. यावर रिअॅक्ट करत नीना कुळकर्णींनी लिहिले, "युट्यूबवर माझ्या निधनाची फेक बातमी पसरत आहे. मी जिवंत आहे आणि स्वस्थ आहे. देवाच्या कृपेने कामात व्यस्त आहे. कृपया अशा अफवांकडे दुर्लक्ष करा आणि प्रोत्साहन देऊन नका. मला दीर्घायुष्य मिळो."
नीना कुळकर्णी या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री आहेत. अमिताभ बच्चन ते शाहरुख खान अशा सर्वच अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केलं आहे. वयाच्या ६९ व्या वर्षीही त्या अगदी फीट आणि कामात व्यस्त आहेत. तर त्यांची मुलगी सोहा कुळकर्णी ही सोनी मराठी वाहिनीची क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे.