60 च्या दशकात बाल कलाकाराच्या रूपात अभिनयाची कारकिर्द सुरु करणा-या आणि पुढे हिंदी सिनेमातील एक प्रतिभावान अभिनेत्री अशी ओळख निर्माण करणा-या नीतू सिंग यांचा आज (8 जुलै) वाढदिवस. ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या पत्नी आणि रॉकस्टार रणबीर कपूरची आई, अशीही नीतू सिंग यांची ओळख आहे. 8 जुलै 1958 रोजी नीतू सिंग यांचा जन्म झाला. 1972मध्ये ‘रिक्शावाला’ या चित्रपटातून त्यांनी अभिनेत्री म्हणून करिअरला सुरूवात केली. पण ‘यादो की बारात’ या सिनेमाने त्यांना खरी ओळख दिली.
1975मध्ये नीतू यांनी ऋषी कपूर यांच्यासह ‘खेल खेल में’ हा सिनेमा केला आणि एकत्र काम करता करता ते एकमेकांच्या प्रेमात पडले. या लोकप्रिय जोडीने 11 सिनेमांत एकत्र काम केले. ख-या आयुष्यात पती-पत्नी म्हणून वावरताना नीतू यांनी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ऋषी यांना सोबत केली.
ऋषी कपूर आणि नीतू कपूर या जोडीचा पहिला सिनेमा ‘जहरीला इन्सान’ होता. पण हा चित्रपट दणकून आपटला. नीतू अगदी 14 वर्षांच्या असताना त्यांनी ऋषी कपूरला डेट करण्यास सुरूवात केली. सिनेमाच्या सेटवर ऋषी कपूर नीतूला सतत छेडत असायचे. त्यांची ही सवय नीतूला इरिटेट करत असे. मात्र हळू हळू हाच राग प्रेमात रुपांतरीत झाला. ‘खेल खेल में’ सिनेमानंतर ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या रोमान्सची चर्चा रंगली.
आपल्या लग्नात ऋषी कपूर आणि नीतू सिंग दोघेही बेशुद्ध पडले होते. अर्थात वेगवेगळ्या कारणांनी. नीतू यांचा लेहंगा इतका जड होता की, तो त्या सांभाळू शकल्या नाहीत आणि त्या बेशुद्ध पडल्या. तर ऋषी कपूर हे आजुबाजूच्या गर्दीमुळे भोवळ येऊन खाली पडलेत. दोघेही शुद्धीवर आल्यानंतरच त्यांचे लग्न झाले होते.
ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांचे अफेअर प्रचंड गाजले होते. लग्नापूर्वी ऋषी कपूर यांचे नाव अनेकींशी जोडले गेले होते. लग्नानंतरही स्वत:पेक्षा अर्ध्या वयाच्या दिव्या भारतीशी त्यांचे नाव जोडले गेले. नीतू यांना ही गोष्ट कळली. पण त्या शांत राहिल्या.
नीतू एका मुलाखतीत ऋषी कपूर यांच्या अफेअरबद्दल बोलल्या होत्या. ‘आम्ही एकमेकांशी डेट करत असतानाही ऋषी कपूर एका दुस-या अभिनेत्रीसोबत फ्लर्ट करत होते. पण माझे अफेअर नाही, असे ते दाखवत. त्यांना विचारले की, असे काहीही नसल्याचे सांगत. मी खूप साधी आणि निष्पाप होते. ऋषी यांच्या प्रत्येक गोष्टीवर मी विश्वास ठेवायचे. मी सिंपल मुलगी आहे आणि मला सांभाळू शकते, असे त्यांनाही वाटायचे,’ असे नीतू या मुलाखतीत म्हणाल्या होत्या.