नेहा धुपिया सध्या रोडीज या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. या कार्यक्रमाचा हा 18 वा सिझन असून तिच्या एका वक्तव्यामुळे तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. नेहाच्या या वक्तव्यावर अनेक मीम्स बनले असून याचीच सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
रोडीजचा ऑडिशन राऊंड प्रेक्षकांना नेहमीच आवडतो. या ऑडिशन राऊंडमधील काही वक्तव्यांमुळे आजवर स्पर्धकांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. पण पहिल्यांदाच एका परीक्षकाला ट्रोल करण्यात आले आहे. नेहा या कार्यक्रमासाठी एका स्पर्धकाचे ऑडिशन घेत होती. त्यावेळी त्या स्पर्धकाने नेहाला सांगितले की, त्याची एक प्रेयसी होती. ती त्याला फसवत होती. तिचे पाच बॉयफ्रेंड असल्याचे त्याला कळले होते. त्यामुळे त्याने तिला मारले होते. त्यावर नेहाने उत्तर दिले होते की, एखाद्या मुलीला किती मुलांसोबत राहायचे हा तिचा सर्वस्वी निर्णय आहे. पण या तिच्या उत्तरामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
नेहाच्या या वक्तव्यामुळे सध्या ती सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे. सोशल मीडियावर तिला चांगलेच सुनावले जात असले तरी तिने किंवा रोडीजच्या टीमने यावर मौन राखणेच पसंत केले आहे.
सोशल मीडियावर यावर मजेदार मीम्स व्हायरल झाले आहेत. मुलीने फसवले तर ती तिची चॉईस आणि मुलांनी फसवले तर ते खोटारडे.... असे एकाने ट्वीट केले आहे.
तर एकाने नेहाला आधुनिक काळातील दौपदी अशी उपमा दिली आहे.
नेहा वेडी झाली असल्याचे देखील एकाने लिहिले आहे.
नेहाचे वक्तव्य ऐकल्यानंतर माझ्या डोक्यात एकच संवाद येतो, तो म्हणजे ती स्त्री असून ती काहीही करू शकते असे एकाने मीम शेअर केले आहे.