अभिनेत्री नेहा महाजनने मराठी, तमीळ व इंग्रजी सिनेमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत 'कॉफी अॅण्ड बरेच काही', 'निळकंठ मास्तर' व 'वन वे तिकिट' या मराठी सिनेमात नेहाने काम केले आहे. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती 'गांव' या हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 'गांव' चित्रपटाची कथा भारत नामक ग्रामीण भागात वसलेल्या गावाभोवती फिरते. या गावातील विकासाची कथा यात दाखवण्यात आली आहे. गौतम सिंग यांनी सांगितले की, ''गांव' चित्रपटाच्या शूटिंगआधी कलाकारांकडून चित्रपटासाठी खूप तयारी करून घेतली होती. या चित्रपटात रामगढ गावातील लोकांनी देखील काम केले आहे. त्यांना त्यांची भूमिका समजावी यासाठी बरेच वर्कशॉप घेतले. या चित्रपटातील प्रमुख कलाकारांसोबत गावातील लोकांनी देखील चांगले काम केले आहे.'या चित्रपटाबद्दल नेहा महाजनने सांगितले की,''गाँव' या चित्रपटात माझे नाव ‘सांगो’ आहे. अत्यंत कलात्मक आणि बिनधास्त अशी ही भूमिका आहे. ''ये मर्द, औरत, छोटे, बडे ये सब अंग्रेजी चोचले है, इस गाँव मे सब बराबर है,'' या वाक्यातून शहरीकरणाबाबतची तिची वेगळी दृष्टी व्यक्त होते.'
या चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम सिंग यांनी केले असून या चित्रपटात नेहा महाजन व्यतिरिक्त शादाब कमल, गोपाल के सिंग, रोहित पाठक, दिब्येंदु भट्टाचार्य, ओमकार दास मानिकपुरी, शिशिर शर्मा व प्रवीणा देशपांडे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा २६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.