'बिग बॉस मराठी २' या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत असून या घरातील सगळेच स्पर्धक आता प्रेक्षकांचे प्रचंड आवडते बनले आहेत. या कार्यक्रमात यंदाच्या आठवड्यात विद्याधर जोशी घराच्या बाहेर पडले असून सध्या घरात असलेल्या स्पर्धकांपैकी कोण स्पर्धक विजेता ठरणार याचा प्रत्येकजण अंदाज लावत आहे. काही सेलिब्रेटींचे तर या कार्यक्रमामुळे फॅन क्लब तयार झाले असून आपला आवडता सेलिब्रेटी जिंकावा यासाठी त्यांचे फॅन्स प्रयत्न करत आहे.
बिग बॉस मराठीच्या घरात आपल्याला नेहा शितोळेला सध्या पाहायला मिळत असून या कार्यक्रमामुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. आज म्हणजेच २७ जूनला नेहाचा वाढदिवस आहे. नेहा ही मुळची पुण्याची असून पुण्यातील एसपी कॉलेजमध्ये तिचे शिक्षण झाले आहे. अगदी लहान वयापासूनच तिला अभिनयाविषयी आवड असल्याने ती कॉलेजमधील विविध कल्चरल कार्यक्रमात भाग घेत असे. नेहाला अभिनयक्षेत्रात करियर करण्यात रस असला तरी तिने या क्षेत्रात जाऊ नये असे तिच्या कुटुंबियांना वाटत होते.
नेहाने पालकांचे ऐकून युपीएससीचा अभ्यास करायला सुरुवात केली. तिने या दरम्यान अनेक भाषा देखील शिकल्या. भारतीय भाषांसोबतच अनेक पाश्चिमात्य भाषा देखील नेहाला येतात. पण तरीही तिचे मन लागत नव्हते. तिला अभिनयक्षेत्रातच करियर करायचे होते. अखेर तिने नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. तिने अनेक वर्षं स्ट्रगल केल्यानंतर तिला मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. देऊळ हा तिचा पहिला मराठी चित्रपट होता.
नेहाने रेडीमिक्स, सुर सपाटा, पोस्टर गर्ल यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. नेटफ्लिक्सच्या सेक्रेड गेम्स या प्रसिद्ध बेवसिरिजमध्ये ती काटेकरच्या पत्नीच्या भूमिकेत ती दिसली होती. नेहाला बिग बॉसमुळे तर सध्या चांगलेच फॅन फॉलोव्हिंग मिळाले आहे. नेहाचे लग्न झाले असून तिच्या पतीचे नाव नचिकेत पूर्णपत्रे असून तो प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने कमीने, रॉकी हँडसम, मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर यांसारख्या हिंदी तसेच झिपऱ्या, अस्तू यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.