- Suvarna Jain
अभिनेत्री अनुष्का शर्माविरोधात शेजाऱ्यांनी मुंबई महापालिकेत तक्रार दाखल केली आहे. घराचे इलेक्ट्रिक जंक्शन अर्थात मीटर बॉक्स बेकायदेशीररीत्या फ्लोरच्या पॅसेज एरियामध्ये बनवले आहे. याविरोधात सोसायटीच्या रहिवाशांनी नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप अनुष्कावर केलाय. मात्र, अशा प्रकारे राहत्या सोसायटीमधील नागरिकांशी आणि शेजाऱ्यांशी वाद झालेली अनुष्का ही काही पहिली सेलिब्रिटी नाही. याआधीही अनेक कलाकार शेजाऱ्यांशी झालेल्या वादामुळे अडचणीत आले आहेत. पाहू या कोण आहेत हे सेलिब्रिटी आणि काय होता त्यांचा शेजाऱ्यांशी वाद?करिना कपूर-खानबेगम करिना कपूर खान हिनं की एंड का सिनेमाच्या यशानिमित्त आपल्या घरी पार्टी आयोजित केली होती. रात्री उशिरापर्यंत ही पार्टी सुरू होती. रात्री उशिरापर्यंत कर्णकर्कश म्युझिकच्या तालावर ही पार्टी रंगली होती. या आवाजामुळे करिनाच्या शेजाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. त्यांनी याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेऊन पोलीस तिथं दाखल झाले आणि त्यांनी ही कर्णकर्कश पार्टी थांबवली.शाहीद कपूरशाहीद कपूरच्या जुहू इथल्या बंगल्यावर काही महिन्यांपूर्वी नूतनीकरणाचं काम हाती घेण्यात आलं होतं. या कामादरम्यान बांधकाम करणाऱ्या मजुरांनी भिंती खराब केल्या होत्या. त्यामुळे स्थानिक रहिवासी हैराण झाले होते. या शाहिदच्या सोसायटीतल्या रहिवाशांनी त्याच्याविरोधात तक्रारही दाखल केली होती.शाहरूख खानव्हॅनिटी व्हॅन उभ्या करण्यासाठी मन्नत या बंगल्याबाहेर बेकायदेशीररीत्या रॅम्प बांधल्याप्रकरणी अभिनेता किंग खान शाहरूख वादात सापडला होता. या अनधिकृत रॅम्पमुळे या परिसरात वाहतूककोंडी होत होती. त्यामुळे स्थानिकांनी या रॅम्पविरोधात आवाज उठवून आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन मुंबई महापालिकेने २०१५मध्ये या अनधिकृत रॅम्पवर हातोडा चालवला.आदित्य पांचोलीअभिनेता आदित्य पांचोली याचेही त्याच्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध राहिले नाहीत. आदित्य पांचोलीच्या घराच्या नूतनीकरणाचं काम सुरू होतं. यावरूनच आदित्य पांचोली आणि त्याच्या शेजाऱ्यांमध्ये जोरदार वादावादीही झाली. या वेळी आदित्य पांचोलीने त्याच्या शेजाऱ्यांना धमकावल्याचा आरोप झाला. याप्रकरणी आदित्य पांचोलीविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.शक्ती कपूरबॉलिवूडचा क्राईम मास्टर गो-गो म्हणजेच शक्ती कपूर. सिनेमात नायिका आणि नायकांना त्रास देणारा शक्ती कपूर रियल लाइफमध्ये शेजाऱ्यांसाठीही त्रासदायक ठरला. लिफ्टमध्ये जाण्या-येण्यावरून शक्ती कपूर आणि तो राहत असलेल्या सोसायटीतील नागरिकांमध्ये जोरदार वादावादी झाली होती. इतकेच नाही तर शक्ती कपूर बिल्डिंगच्या कॉरिडोअरमध्ये अर्धनग्न अवस्थेत वावरत असल्याची तक्रारही नागरिकांनी केली होती. मात्र, काही वर्षांनंतर दिलेल्या एका मुलाखतीत अशी घटना घडल्याचे शक्ती कपूरने मान्य केले. आता आपले आपल्या सोसायटीमधील नागरिकांशी चांगले संबंध असल्याचेही त्याने स्पष्ट केले.