सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 11 चित्रपट देणारा आणि प्रत्येक चित्रपटातीन अभिनयासाठी कौतुकास पात्र ठरलेल्या सुशांतने एका वळणावर स्वत:ला संपवले असेल? असा सवाल प्रत्येकाच्या मनात आहे. अनेक लोक यावर वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत आहेत. मात्र अनेकजण सुशांतच्या मृत्यूला बॉलिवूडमधील लॉबिंग आणि नेपोटिझमला जबाबदार मानत आहेत. सुशांतच नाही तर इंडस्ट्रीतील अनेकांचे करिअर उद्धवस्त करण्या-या बड्या बड्या लोकांची नावे समोर येत आहेत. अशात एक नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे अभिनेता नील नितीन मुकेश याचे. नील नितीन मुकेशचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडीओचा दाखला देत अनेकांनी नील नितीनचे करिअर संपवण्याला शाहरूख खान व सैफ अली खानला जबाबदार ठरवले आहे.ट्विटरवर सध्या #NeilNitinMukesh ट्रेंड करतोय. अनेक लोक नीलचा जुना व्हिडीओ शेअर करत आहे. या व्हिडीओत नील न घाबरता बोलला आणि यानंतर त्याचे करिअर संपले, असा दावा केला जात आहे. हा व्हिडीओ एका अवार्ड फंक्शनचा आहे. यात स्टेजवर शाहरूख खान व सैफ अली खान नीलच्या नावाची खिल्ली उडवताना दिसत आहेत.
काय आहे व्हिडीओतस्टेजवर होस्टिंग करत असलेले शाहरूख व सैफला प्रेक्षकांमध्ये बसलेल्या नीलला त्याच्या नावावरून प्रश्न विचारतात. नील नितीन मुकेश हे सर्व फर्स्ट नेम आहेत. यात सरनेम कुठे आहे? असे शाहरूख सैफ म्हणतात. यावर सगळे जण हसायला लागतात. पण प्रेक्षकांमध्ये बसलेल्या नील नितीन मुकेशच्या चेह-यावर जराही हास्य दिसत नाही. तो फक्त गप्प उभा राहतो. त्याला पाहून शाहरूख पुन्हा त्याची मजा घेतो. आम्हा सर्वांचे सरनेम खान, रोशन आहे. तुला सरनेम का नाही? यानंतर मात्र नील बोलू लागतो. सर, खूप चांगला प्रश्न आहे. काय मी तुम्हाला काही बोलू शकतो? असे तो विचारतो. यावर प्लीज, प्लीज बोल, असे शाहरूख त्याला म्हणतो. मग मात्र नीलचा संताप अनावर होतो.
‘सर, तुम्ही माझी थेट खिल्ली उडवत आहात. ही पद्धत चुकीची आहे. माझे वडील माझ्यासोबत आहेत आणि तुम्ही मला असे प्रश्न करता. माझ्या नावाची टर उडवता. माफ करा, पण मी हा माझा अपमान मानतो. माझ्या मते, हे चूक आहे. मी तुम्हाला एवढेच म्हणेल की शट अप...,’ असे नील म्हणतो. त्यावर सैफ पुन्हा बोलतो. पण तुझे सरनेम काय आहे,? असे तो विचारतो. यावर नील म्हणतो, मला सरनेमची गरज नाही. मी खूप मेहनत घेतलीय इथे पोहोचण्यासाठी. आज मी पहिल्या 10 रांगेत बसलो आहे आणि तुम्ही मला प्रश्न विचारत आहात. मी केवळ शट अप, एवढेच म्हणेल.
या व्हिडीओनंतर नील नितीन मुकेशच्या करिअर पद्धतशीरपणे संपवण्यात आले, हळूहळू त्याला सिनेमे मिळणे बंद झाले, असे अनेक लोकांनी म्हटले आहे.