सनी देओलच्या 'गदर 2' (Gadar 2) सिनेमाने सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातलाय. २२ वर्षांपूर्वी आलेल्या 'गदर एक प्रेम कथा' या सुपरहिट सिनेमाचा हा सिक्वल आहे. तारासिंग आणि सकीनाची प्रेमकहाणी गदरमध्ये दाखवण्यात आली होती. तर आता त्यांच्या मुलाची प्रेमकहाणी या सिनेमात दाखवली आहे. तसंच तारासिंगचं देशप्रेम, सनी देओलचे अॅक्शन सीन्स या सिनेमात दिसत आहे. 2001 साली ज्या दिवशी 'गदर' रिलीज झाला होता त्याच दिवशी आमिर खानचा 'लगान' (Lagaan) सिनेमाही रिलीज होता. दोन्ही चित्रपटाने ऐतिहासिक कामगिरी केली. पण 2001 साली सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट तिसराच होता.
अजय देवगण, सनी देओल, आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान या अभिनेत्यांच्या जुन्या सिनेमांचा तो काळच वेगळा. उत्तम स्टारकास्ट आणि स्टोरीमुळे तेव्हाचे सिनेमे अजरामर झाले. तेव्हा दोन सिनेमांमध्ये क्लॅश असला तरी दोन्ही चित्रपट बरोबरीचीच कमाई करायचे. प्रेक्षकांमध्येही तेव्हा चित्रपटांची क्रेझ होती. २००१ हे वर्ष तर सिनेमांचंच होतं. कित्येक चित्रपट तेव्हा तुफान गाजले जे आजही आवडीने पाहिले जातात. 'गदर', 'लगान', 'कभी खुशी कभी गम', 'दिल चाहता है', 'रहना है तेरे दिल मे', 'तुम बिन' असे सुपरहिट चित्रपट 2001 साली रिलीज झाले. या सर्व सिनेमांमध्ये सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा म्हणजे करण जोहरचा 'कभी खुशी कभी गम' हा होता. सिनेमाने 135.53 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर 'गदर' त्या पाठोपाठ 'गदर'ने 133.13 कोटींचा व्यवसाय केला होता. आमिर खानच्या 'लगान'ने 65.97 कोटी रुपयांची कमाई केली होती.
'कभी खुशी कभी गम' करण जोहरचा दुसराच सिनेमा होता. हा एक फॅमिली ड्रामा होता आणि सिनेमातील स्टारकास्टही मोठी होती. अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, हृतिक रोशन, काजोल, करिना कपूर अशी सिनेमाची तगडी स्टारकास्ट होती. आजही हा सिनेमा लोक आवडीने पाहतात. तर आता २२ वर्षानंतर सनी देओलने पुन्हा बॉक्सऑफिसवर 'गदर' केला आहे. सिनेमाने पाच दिवसातच २०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.