‘इंडियन मॅचमेकिंग’ या शोमुळे टीकेचे लक्ष्य ठरलेल्या नेटफ्लिक्सला पुन्हा एकदा लोकांच्या संतापाचा सामना करावा लागतोय. याचे कारण म्हणजे, नेटफ्लिक्सवर गेल्या 19 ऑगस्टला प्रदर्शित झालेला ‘क्युटीज’ हा सिनेमा. नेटफ्लिक्सच्या या ओरिजनल फ्रेंच सिनेमावर सध्या जोरदार टीका होतेय. वाढत्या टीकेमुळे अखेर नेटफ्लिक्सला माफी मागावी लागलीय.
‘क्यूटीज’ हा एक फ्रेंच कॉमेडी ड्रामा आहे. एका कट्टर मुस्लिम कुटुंबात वाढणा-या मुलीची ही कथा आहे. जी सर्व बंधने झुगारून इंटरनेटच्या दुनियेत पाऊल ठेऊ इच्छिते, डान्स शिकू इच्छिते. या सिनेमाच्या पोस्टरमध्ये मुलीला उत्तेजक नृत्य करताना दाखवले आहे. या पोस्टरवरून वाद निर्माण झाला आहे. सिनेमातील काही दृश्यांवरही लोकांनी संताप व्यक्त केला. सिनेमातील दृश्ये बाल लैंगिक शोषणाला खतपाणी घालणारी आहेत, असे म्हणत लोकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.यापूर्वी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित ‘इंडियन मॅचमेकिंग’ असाच वादात सापडला होता. हा शो वर्णभेद, जातीभेद व लिंगभेदाला चालना देणारा असल्याचा आरोप प्रेक्षकांनी केला होता.
नेटफ्लिक्सने मागितली माफी
‘क्यूटीज’मध्ये दाखवण्यात आलेल्या अयोग्य कलाकृतीबद्दल आम्ही माफी मागतो. ते अयोग्य होते. आक्षेपार्ह पोस्टर आणि विवरणात आम्ही बदल केला आहे,’ अशा शब्दांत नेटफ्लिक्सने प्रेक्षकांची माफी मागितली.