ठळक मुद्देआम्ही नेटफ्लिक्सच्या ज्या ओरिजनल थ्रीलर मुव्हीबद्दल बोलतोय, तिचे नाव आहे, ‘बर्ड बॉक्स’. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.
सध्या नेटफ्लिक्सची एक ओरिजनल थ्रीलर मुव्ही प्रचंड चर्चेत आहे. हा चित्रपट एका खास थीमवर आधारित आहे. या चित्रपटाने लोकांना जणू वेड लावले आहे. इतके की, लोक या चित्रपटाची कॉपी करत सुटलेत आणि याचा परिणाम म्हणजे, यातून अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत. हा प्रकार पाहून अखेर नेटफ्लिक्सला या चित्रपटाचे अनुकरण न करण्याचा इशारा जारी करावा लागला आहे.
आम्ही नेटफ्लिक्सच्या ज्या ओरिजनल थ्रीलर मुव्हीबद्दल बोलतोय, तिचे नाव आहे, ‘बर्ड बॉक्स’. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. Susanne Bier यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. यात एका घटनेनंतर एक अमेरिकन महिला स्वत:ला आणि मुलांना एका रहस्यमयी शक्तीपासून वाचवण्यासाठी डोळ्यांवर पट्टी बांधून एका जीवघेण्या प्रवासाला निघते. या रहस्यमयी शक्तीने शहरातील अनेक लोकांना ठार केले आहे. जो कुणी या रहस्यमयी शक्तीला आपल्या डोळ्यांनी बघतो, त्याचा मृत्यू अटळ ठरतो. त्यामुळे ही अमेरिकन महिला डोळ्यांवर पट्टी बांधून या शक्तीला आव्हान देण्यासाठी निघते.
चित्रपटातील अमेरिकन महिलेची भूमिका Sandra Bullock हिने साकारली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाल्यापासून लोक त्यातील अनेक दृश्यांचे अनुकरण करताना दिसत आहेत. अनेक मीम्स, व्हिडिओ बनत आहेत. लोक एकमेकांना बर्ड बॉक्स चॅलेंज देत आहेत. डोळ्यांवर पट्टी बांधून अनेक स्टंट करत आपला जीव धोक्यात घालत आहेत. लोक मुलांसोबतही यातील काही स्टंट करताना दिसत आहेत.
हा सगळा प्रकार पाहून अखेर नेटफ्लिक्सला अलर्ट जारी करावा लागला. आम्हाला अलर्ट जारी करावा लागतोय, यावर विश्वास बसत नाहीये. कृपया बर्ड चॅलेंजने स्वत:चा जीव धोक्यात घालू नका. या चॅलेंजची सुरुवात कुठून झाली, आम्हाला ठाऊक नाही. पण कृपया स्वत:ला रूग्णालयात पोहोचवू नका, असे नेटफ्लिक्सने म्हटले आहे.