Join us

सुटेबल बॉयमधल्या 'त्या' दृश्यानं नेटकरी खवळले; नेटफ्लिक्सवर बहिष्काराची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2020 4:55 PM

हिंदू देव-देवतांचा अपमान झाल्यानं नेटकऱ्यांचा आक्षेप; बहिष्कारासाठी नेटकऱ्यांचं आवाहन

मुंबई: 'सुटेबल बॉय'मधील एका दृश्यावरून नेटकरी संतापले असून नेटफ्लिक्सवर बहिष्काराची मागणी जोर धरू लागली आहे. #BoycottNetflix ट्विटरवर ट्रेंडमध्ये असून अनेक जण हॅशटॅग वापरून आपला संताप व्यक्त करत आहेत. विक्रम सेठ यांनी लिहिलेल्या पुस्तकावरून मीरा नायर यांनी सुटेबल बॉय नावाची मिनीसिरिजची निर्मिती केली. यामध्ये एक प्रेमी युगुल मंदिरात किस करत असतानाच दृश्य आहे. यामधील एक जण मुस्लिम, तर दुसरी व्यक्ती हिंदू आहे.सुटेबल बॉयमध्ये तान्या मानिकतळानं लता मेहरा नावाचं पात्र रंगवलं आहे. तर दानिश रझवीनं कबीर दुरानी नावाची व्यक्तीरेखा साकारली आहे. मिनीसीरिजमधील एका दृश्यात लता आणि कबीर मंदिरात किस करतानाच दृश्य आहे. फाळणीनंतरचा जातीय तणाव आणि हिंदू-मुस्लिम यांच्यातील संबंध यावर सुटेबल बॉयचं कथानक आधारलेलं आहे. सुटेबल बॉयचे सर्व एपिसोड्स नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहेत. सुटेबल बॉयमधील दृश्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचं अनेकांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे. त्यामुळे नेटफ्लिक्सवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणी नेटकऱ्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी कराव्यात असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गौरव गोयल यांनी केली आहे. नेटफ्लिक्स जाणूनबुजून हिंदू देव-देवतांचा अपमान करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मात्र त्यांनी त्यांच्या आवाहनात कुठेही द सुटेबल बॉयचा उल्लेख केलेला नाही. मध्य प्रदेशमधील भाजप नेते आणि खासदार नरोत्तम मिश्रा यांनीदेखील सुटेबल बॉयमधील दृश्याबद्दल आक्षेप नोंदवला आहे. सुटेबल बॉयमधील दृश्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या असून या प्रकरमात कायदेशीर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अनेक नेटकऱ्यांनी याआधीही नेटफ्लिक्सनं अशाच प्रकारे भावना दुखावल्या होत्या याकडे लक्ष वेधलं आहे. 'नेटफ्लिक्सनं हे पहिल्यांदा केलेलं नाही आणि हे शेवटचंही असणार नाही. अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याखाली किती काळ हे सुरू राहणार? असे प्रकार थांबवण्यासाठी भूमिका घेणं गरजेचं आहे,' असं आवाहन नेटकऱ्यांनी केलं आहे.

टॅग्स :नेटफ्लिक्स