दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत असलेला 'अन्नपूर्णी' सिनेमा चर्चेत आला आहे. प्रभू श्रीराम यांच्याबद्दलच्या आक्षेपार्ह विधानामुळे या सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. लव्ह जिहाद आणि हिंदूच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप नयनताराच्या अन्नपूर्णी सिनेमावर करण्यात आला होता. त्यानंतर या सिनेमाला प्रचंड ट्रोलही करण्यात आलं. आता नयनताराच्या या सिनेमामुळे नेटफ्लिक्सला बॉयकॉट करण्याची मागणी होत आहे.
नयनताराचा 'अन्नपूर्णी' सिनेमा डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमात नयनतारा एक शेफच्या भूमिकेत असून ती हिंदू पुजाऱ्याची मुलगी दाखविण्यात आली आहे. कुकींगच्या एका स्पर्धेत भाग घेतलेल्या नयनताराला सिनेमातील अभिनेता श्रीरामही मांसाहारी होते असं सांगत मांस खाण्यासाठी प्रवृत्त करतो. याशिवाय सिनेमातून लव्ह जिहादलाही प्रोत्साहन दिल्याचा आरोप करत रमेश सोलंकी यांनी या सिनेमाविरोधात मुंबईत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर सिनेमाबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होत्या. आता नेटकऱ्यांनी नेटफ्लिक्सला बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे.
याबाबत नेटकऱ्यांनी पोस्ट करत ट्वीटरवर #boycottnetflix हा हॅशटॅग ट्रेंड केला आहे.
ट्वीट करत अनेकांनी हा सिनेमा नेटफ्लिक्सवरुन काढून टाकण्यास सांगितलं आहे.
या तमिळ सिनेमातून लव्ह जिहादला प्रोत्साहन दिल्याचंही एकाने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
'अन्नपूर्णी' सिनेमातील नेमका डायलॉग काय?
या सिनेमात अभिनेता नयनताराला म्हणतो की राम, लक्ष्मण आणि सीतेने वनवासात असताना भूक लागल्यावर प्राण्यांना मारुन खाल्लं होतं असं वाल्मिकींनी रामायणात म्हटलं आहे. ते मांसाहारी होते, असंही पुढे म्हटलं गेलं आहे. प्रभू श्रीराम यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे 'अन्नपूर्णी' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.