'नवीन सुरूवात', संग्राम समेळने लग्नानंतर पहिल्यांदाच शेअर केला पत्नी सोबतचा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 10:45 AM2021-03-15T10:45:58+5:302021-03-15T10:47:00+5:30
अभिनेता संग्राम समेळ नुकताच दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता संग्राम समेळ नुकताच दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकला आहे. संग्रामच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पहायला मिळाले. इचलकरंजीला हा विवाह सोहळा पार पडला. संग्रामचे हे दुसरे लग्न आहे. २०१६ मध्ये संग्रामचे पल्लवी पाटीलसोबत लग्न झाले होते मात्र काही कारणामुळे दोघे वेगळे झाले. लग्नानंतर पहिल्यांदाच संग्राम समेळने इंस्टाग्रामवर पत्नीसोबतचा फोटो शेअर केला आहे.
संग्राम समेळ याने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर पत्नी श्रद्धा फाटकसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की नवीन सुरूवात. संग्रामच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.
संग्रामची पत्नी श्रद्धा फाटक डान्सर आहे. तिचे डान्सचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत श्रद्धा फाटक हिने संग्रामबद्दल भरभरून बोलली. संग्राम खूप काळजी घेतो आणि प्रेमळ असल्याचे म्हटले.
मालिका, चित्रपट व नाटक अशा तिन्ही माध्यमातून अभिनेता संग्राम समेळने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. नाटकापासून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली.स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ललित २०५' या मालिकेत तो दिसला होता. या मालिकेत त्याने नील राजाध्यक्षची भूमिका साकारली होती.
संग्रामला खरी ओळख मिळाली ती पुढचं पाऊल या मालिकेतून. या मालिकेतील समीर या व्यक्तीरेखेमुळे तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने 'एकच प्याला' या नाटकात काम केले. या संगीत नाटकातील त्याची सुधाकरची भूमिका प्रेक्षकांना आवडली. 'हे मन बावरे'मध्ये संग्राम दिसला होता. संग्रामने मार्केटिंगमध्ये पोस्ट ग्रॅजुएशन केलं आहे. अभिनयाचे धडे त्याला घरातूनच मिळाले आहेत.