अभिनेत्री दीपिका पादुकोण व अभिनेता रणवीर सिंग लग्नानंतर सहा वर्षांनी आई-बाबा झाले आहेत. दीपिकाने गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ८ सप्टेंबर २०२४ रोजी मुलीला जन्म दिला. दीपिका आठवडाभर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल होती. अखेर १५ सप्टेंबर रोजी तिला डिस्चार्ज मिळाला. दीपिका आणि तिच्या लेकीसह रणवीर सिंह अनेक गाड्यांच्या ताफ्यासह त्यांच्या घरी परतताना दिसले होते. चिमुकल्या पावलांनी दीपिका आणि रणवीरच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं, असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही.
मुलगी घरात येताच दीपिकाने नवी मालमत्ता खरेदी केली आहे. एक दोन नाही तर 17.73 कोटींचा फ्लॅट दीपिकाने खरेदी केला आहे. विशेष म्हणजे, दीपिकाने खरेदी केलेला हा फ्लॅट तिची सासू अंजू भवनानी यांनी खरेदी केलेल्या अपार्टमेंटच्या शेजारी आहे. दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण हे सह-मालक असेल्या कंपनीच्या नावाखाली ही माल खरेदी करण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
मुलीच्या जन्माच्या दोन दिवसाआधीच दीपिका व रणवीर सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले होते. कुटुंबासह जोडीने सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी दीपिकाला मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अजूनपर्यंत त्यांनी आपल्या लेकीचं नाव ठेवलं नाही, मात्र सोशल मीडियावर चाहत्यांकडून विविध नावांवर चर्चा सुरू आहे.
दीपिका पादुकोणच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती शेवटची प्रभास व अमिताभ बच्चन यांच्यासह 'कल्की 2898 एडी'मध्ये झळकली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिवसर जबरदस्त कमाई केली. 'सिंघम अगेन' हा तिचा आगामी चित्रपट आहे. हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होईल.