बॉलिवूडची अभिनेत्री आणि खासदार किरण खेर यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. या वृत्ताचे खंडन अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरवर केले आहे. अनुपम खेर यांनी ट्विट केले की, किरण खेर यांच्या तब्येतीला घेऊन काही अफवा सुरू आहेत. हे सर्व खोटे आहे. त्या पूर्णपणे बऱ्या आहेत. उलट त्यांनी दुपारी कोरोनाच्या लशीचा दुसरा डोस घेतला आहे.
सोशल मीडियावर काही लोक किरण खेर यांच्या निधनाची खोटी बातमी देऊन त्यांना श्रद्धांजली वाहत होते. अनुपम खेर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, मी लोकांना विनंती करतो की अशा निगेटिव्ह बातम्या पसरवू नका. आभारी. सुरक्षित रहा.
किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अनुपम खेर यांनी एप्रिल महिन्यात सांगितले की, किरण मल्टीपल मायलोमा (Multiple Myeloma) एक प्रकारच्या ब्लड कॅन्सरने पीडित आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, ती आधीपेक्षा अधिक खंबीर बनून या आजारातून बाहेर येईल. आम्ही नशीबवान आहोत की, उत्तम डॉक्टरांची टीम किरणवर उपचार करतेय. ती फायटर आहे आणि या संकटालाही ती परतवून लावेल. किरण खेर जे काही करते ते मनापासून करते. तिचे हृदय प्रेमाने भरलेले आहे. म्हणूनच लोक तिच्यावर इतके प्रेम करतात. ती ठीक आहे आणि बरी होतेय. तुमच्या प्रेम आणि पाठींब्यासाठी आभार.
मागील वर्षी ११ नोव्हेंबरला किरण खेर यांना चंदीगड येथील राहत्या घरी डाव्या हाताला दुखापत झाली होती. चंदीगडच्या पोस्ट ग्रॅच्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिचर्स येथे त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या गेल्या होत्या. यावेळी त्यांना मल्टिपल मायलोमा झाल्याचे निदान झाले होते. हा एक प्रकारचा ब्लड कॅन्सर आहे. हा कॅन्सर त्यांच्या डाव्या हातापासून उजव्या खांद्यापर्यंत पोहोचला होता. त्यामुळे गेल्या ४ डिसेंबरला त्यांना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले होते.अलीकडे केलेल्या वैद्यकीय चाचण्यांवरून कॅन्सरचे प्रमाण कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या ४ महिन्यांत त्यांनी उपचारांना चांगला प्रतिसाद दिला आहे. आता त्यांना रूग्णालयात भरती होण्याची गरज नाहीये. फक्त चाचण्या व उपचारासाठी नियमितपणे रूग्णालयात जावे लागणार आहे.