कॉलिवूडचे चाहते आपल्या आवडत्या स्टार्ससाठी किती क्रेजी आहेत, हे नव्याने सांगायची गरज नाही. कॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांना चाहते देवासारखे पूजतात. आता या यादीत अभिनेत्री निधी अग्रवालचे नावही सामील झाले आहे. म्हणायला निधी अग्रवालचे कॉलिवूडमध्ये केवळ दोन सिनेमे रिलीज झाले आहेत आणि तिसरा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. पण चाहते तिच्या अक्षरश: प्रेमात पडले आहेत. चेन्नईत निधीचे चक्क मंदिर बांधण्यात आले आहे. खुद्द निधीही हे पाहून हैराण झालीये.
फॅन्सनी व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी निधीला ही स्पेशल भेट दिली. आपले मंदिर उभारले गेलेय, याची माहिती निधीला सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली. तोपर्यंत तिला याची जराही कल्पना नव्हती. काही चाहत्यांनी निधीच्या मंदिराचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत आणि निधी हे फोटो पाहून उडालीच.हे मंदिर चेन्नई नेमके कुठे उभारले गेलेय, याची माहिती नाही. पण निधीच्या तेलगू व तामिळ चाहत्यांनी हे मंदिर बांधले आहे. या मंदिरात काही चाहते निधीच्या प्रतिमेल दूधाने न्हाऊ घालत असल्याचे फोटोत दिसतेय.यापूर्वी चाहत्यांनी खुशबू, नमिता, हंसिका मोटवानी अशा काही अभिनेत्रींचे मंदिर उभारले आहेत.
काय म्हणाली निधी...
माझ्या चाहत्यांनी माझे मंदिर बांधले, हा माझ्यासाठीही सुखद धक्का होता. मी याची अजिबात अपेक्षा केली नव्हती. पण मी चाहत्यांची आभारी आहे. त्यांचे प्रेम पाहून मी भारावून गेली आहे. माझ्या प्रतिमेला दूधाचा अभिषेक घालणारे हे लोक माझे सच्चे चाहते आहेत. मी त्यांची ऋणी आहे. हे माझ्यासाठी व्हॅलेन्टाईन डेचे सर्वात मोठे गिफ्ट आहे, असे निधी म्हणाली. मी इंडस्ट्रीत खूप नवीन आहे. माझे कोणतेही फॅन पेजही नाही. मला मुलांसाठी व प्राण्यांसाठी काही करायची इच्छा आहे, असे मी माझ्या एका मुलाखतीत म्हणाले होते. माझी ती मुलाखत वाचल्यानंतर काही चाहत्यांनी त्यादिशेनेही कार्य सुरु केले आहे. हे सगळे माझ्यासाठी नवे आहे. या प्रेमासाठी आभार, एवढेच मी म्हणेल.
कोण आहे निधी?
निधी अग्रवालला तुम्ही बॉलिवूड सिनेमातही बघितले असेल. 2017 साली ‘मुन्ना मायकल’ या सिनेमातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. यात ती टायगर श्रॉफ व नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसली होती. 2018 साली तिने तेलगू इंड्रस्टीकडे मोर्चा वळवला. सव्यसाची, मिस्टर मजनू, आयस्मार्ट शंकर या तेलगू सिनेमात ती दिसली. 2019 साली बिग बॉस तेलगू मध्येही ती दिसली होती. भूमी व पूनगोडी या तामिळ सिनेमातही तिने काम केले.