बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) आज आपल्यात नाही. पण तो प्रेक्षकांच्या मनात कायम जिवंत राहील. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारानं गाठलं आणि इरफानने अनपेक्षित एक्झिट घेतली. त्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. आजही इरफानची पत्नी सुतापा (Sutapa Sikdar)आणि मुलगा बाबील इरफानच्या आठवणी शेअर करतात, तेव्हा चाहते भावुक होतात. आज इरफान आपल्यात असता तर त्याचा 55 वा वाढदिवस साजरा करत असता.
गतवर्षी सुतापाने इरफानच्या आठवणीत एक भावुक पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. ‘मृत्यूच्या एकदिवस आधी इरफान निपचिप पडला होता. पण त्याच्या चेहºयावरचे भाव वेगळेच होते. जणू तो त्याच्या आवडत्या गाण्याची फर्माईश करत होता. एखादे गाणे ऐकायची फर्माइश करतानाचे त्याच्या चेहऱ्यावरचे हे भाव मी याआधीही पाहिले होते. त्या दिवशी मी आणि इरफानच्या काही मित्रांनी त्याची आवडती गाणी त्याला गाऊन दाखवली. सगळ्या नर्स आमच्याकडे आश्चर्यकारक नजरेनं पाहत होत्या. कारण त्या कठीण प्रसंगी आम्ही देवाची प्रार्थना करावी, असं त्यांना वाटत असावं. पण इरफानसाठी मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. असं सुतापा यांनी लिहिलं होतं.
या पोस्टच्या पार्श्वभूमीवर सुतापांनी ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत त्या भावुक क्षणाच्या आठवणी शेअर केल्या. ‘तो बेशुद्ध होता पण गाणी ऐकून त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते... दुसऱ्या दिवशी तो आम्हाला सोडून गेला. झूला किने डाला रे, उमराव जान मधील अमरैया झूले मोरा सइयां लूं मै बलइयां,लग जा गले फिर ये हसीं रात हो ना है, आज जाने की जिद ना करो अशी त्याच्या आवडीची गाणी आम्ही त्याला ऐकवली होती. तो निपचिप पडला होता आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. मला आनंद आहे की नकळत का होईना त्याच्या शेवटच्या क्षणात त्याची असलेली ती गाणी ऐकायची इच्छा माझ्याकडून पूर्ण झाली,’ असं सुतापा म्हणाल्या.