बिग बॉस मराठीच्या घरात दररोज काही ना काहीतरी राडा आणि कल्ला होताना दिसतो. सतत स्पर्धकांची भांडणं आणि त्यांच्यातले वादविवाद अशा गोष्टींमुळे बिग बॉस मराठी घर कायम दणाणून सोडण्यात येतं. आज मात्र बिग बॉस मराठीच्या घरात काहीसं हलकंफुलकं वातावरण बघायला मिळणार आहे. बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये आज रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे. यावेळी निक्की तांबोळीने सूरज चव्हाणला भाऊ मानलं असून ती त्याला राखी बांधताना दिसणार आहे.
सूरजला निक्कीने राखी बांधून दिलं वचन
बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचा प्रोमो रिलीज झाला. यात निक्की सूरजला राखी बांधताना दिसत आहे. निक्की राखी बांधताना सूरजला म्हणते, "मला एवढंच म्हणाचंय की या घरात जेवढे दिवस आपण सोबत आहोत, मी वचन म्हणून सांगते की, बाहेरच्या जगात सुद्धा मी तुझी रक्षा करेल. जेव्हापर्यंत आपण दोघे जिवंत आहोत. कोणत्याही गोष्टीची कमी तर आपल्याकडे नाहीय. तुला कधीही माझी आठवण आली एक फोन करायचा अर्ध्या रात्री कधीही. मी पळत येईन तुझ्यासाठी. कोणत्याही शूटींगमध्ये मी असली ना तरीही मी पळत येईन. आय लव्ह यू. खूश रहा नेहमीच." निक्की हे म्हणत असताना सूरजनेेही तिची रक्षा करण्याचं वचन दिलं. शेवटी निक्की त्याला मिठी मारते. सूरज तिच्या पाया पडतो.
अंकिता वालावलकरने DP ला बांधली राखी
कोकण हार्टेड गर्ल अशी ओळख असलेली अंकिता वालावलकरने सुद्धा बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये रक्षाबंधन साजरं केलं. अंकिताने DP अर्थात धनंजय पोवारला राखी बांधली. अंकिताने DP दादांच्या बहिणींच्या वतीने याशिवाय बिग बॉस मराठीमधून बाहेर गेलेल्या योगिता चव्हाणच्या वतीने त्यांना राखी बांधली. अशाप्रकारे आज बिग बॉस मराठीच्या घरात रक्षाबंधन साजरं होणार आहे.